मॅंचेस्टर : टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. विराटच्या टीमने आतापर्यंत ४ मॅच जिंकल्या आहेत, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली. टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये बॅटिंगसोबत बॉलिंगही चांगली होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क याने टीम इंडियाचा बॉलर जसप्रीत बुमराह याचे कौतुक केले आहे. टीम इंडिया बुमहराहच्या कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप जिंकू शकते, परंतु हेच काम डेव्हिड वॉर्नर आपल्या टीमसाठी बॅटने करु शकतो, असे मायकल क्लार्क म्हणाला.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या तीनमध्ये असतील. केव्हिन पीटरसन आणि मायकल वॉन यांनी काहीही म्हणूदेत, पण इंग्लंड वर्ल्ड कप जिंकणार नाही. जे एक बॉलरमध्ये गुण हवेत, ते सर्व गुण बुमराहमध्ये आहेत. बुमराह फीटदेखील आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी तो यशाचा शिल्पकार असणार आहे.' असं वक्तव्य क्लार्कने केलं.


'बुमराहसमोर डेव्हिड वॉर्नरचे आव्हान असणार आहे. वॉर्नरने ६ मॅचमध्ये ४४७ रन केल्या आहेत. मला वॉर्नरकडून अशाच दमदार खेळीची अपेक्षा होती. वॉर्नर एक प्रतिभावान खेळाडू आहे. जर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकली तर त्यात वॉर्नरचे  योगदान महत्त्वाचं असेल', अशी प्रतिक्रिया क्लार्कने दिली.


बुमराह इतका धोकादायक का ?


बुमराह इतका धोकादायक बॉलर का आहे ? असा प्रश्न विचारल्यावर क्लार्क म्हणाला की, 'नव्या बॉलने बुमराह बॉल स्वींग आणि सीम करु शकतो. २० ते ४० ओव्हर या मधल्या टप्प्यादरम्यान बॉलरला खेळपट्टीतून मदत होत नाही. अशावेळी बुमराह आपल्या वेगाने बॅट्समनसाठी अडथळा निर्माण करु शकतो. बुमराहमध्ये १५० किमीच्या वेगाने बॉलिगं टाकण्याची क्षमता आहे. तो यॉर्कर स्पेशालिस्ट आहे. त्याला रिव्हर्स स्विंग मिळाल्या तो अधिक धोकादायक ठरु शकतो.' असं मत क्लार्कने मांडलं.


'प्रत्येक कॅप्टनला निर्णायक आणि मोक्याच्या क्षणी विकेट घेऊन देणार विकेटटेकर बॉलर हवा असतो. बॉलरने इनिंगची सुरुवात करुन द्यावी, शेवटच्या ओव्हरही टाकू शकेल, असा ऑलराऊंडर बॉलर प्रत्येक कॅप्टनला हवा असतो,' असं क्लार्कने सांगितलं.


वॉर्नरची पाठराखण


टीम इंडिया विरुद्ध वॉर्नर फार सावकाश खेळला, अशी टीका करण्यात आली. यावर क्लार्क म्हणाला की, 'वॉर्नर आता परिस्थितीनुसार खेळ करत आहे. वनडे आणि टी-२० हे दोन वेगळे प्रकार आहेत. या दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळ करण्यास त्याला थोडा वेळ लागेल. वॉर्नर सुरुवातीला सावधपणे खेळत आहे. त्याने आतापर्यंत २ शतक ठोकली आहेत. यावरुनच त्याच्या कामगिरीचा अंदाज बांधता येतो.'


विराटचे कौतुक


मायकल क्लार्कने विराट कोहलीचे कौतुक केले. विराट टीम इंडियाचे अंत्यत हुशारीने नेतृत्व करत आहे. विराट एका असामान्य खेळाडूसारखी कामगिरी करत आहे, असं क्लार्क म्हणाला.