मुंबई : २०१९ वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये ऋषभ पंत आणि अंबाती रायुडू यांना संधी देण्यात आली नाही. या दोघांच्याऐवजी दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांची टीममध्ये वर्णी लागली आहे. खरं तर वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये दोन जागांसाठी चार खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. अंबाती रायुडू किंवा विजय शंकर आणि दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांनाच भारतीय टीममध्ये संधी मिळणार होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षभरामध्ये अंबाती रायुडूला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं, पण मागच्या ४ महिन्यांमध्ये रायुडूचा फॉर्म अचानक ढासळला. नोव्हेंबर २०१८ नंतरच्या १० वनडेमध्ये रायुडूला फक्त एक अर्धशतक करता आलं. या १० इनिंगपैकी ५ इनिंगमध्ये रायुडू २० पेक्षा कमी रन करून आऊट झाला. कामगिरीमधल्या या अनिश्चिततेमुळे रायुडूला संधी मिळाली नाही. वनडे क्रिकेटमध्ये रायुडूने ५५ मॅचमधल्या ५० इनिंगमध्ये ४७.०५ च्या सरासरीने १,६९४ रन केले आहेत.


वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीमची घोषणा झाल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी टीमची निवड नेमकी कशी करण्यात आली आणि कोणत्या नावांवर चर्चा झाली याची माहिती दिली.


पंतऐवजी कार्तिकला संधी का?


'ऋषभ पंत का दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोणाला घ्यावं याबद्दल आमच्यामध्ये चर्चा झाली. ऋषभ पंत किंवा कार्तिक यांना संधी फक्त महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त झाला, तरच मिळू शकते. सेमी फायनलसारख्या महत्त्वाच्या मॅचमध्ये विकेट कीपिंगही महत्त्वाची असते. त्यामुळे महत्त्वाच्या मॅचवेळी धोनीला दुखापत झाली, तर विकेट कीपिंगला चांगला पर्याय म्हणून कार्तिकची निवड झाली. पण ऋषभ पंतही या टीममध्ये जवळपास निश्चित होता. धोनीला दुखापत झाली तरच या दोघांपैकी एकाला संधी मिळेल. अशात तणावाची परिस्थिती कार्तिक जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो, असं आम्हाला वाटलं,' असं एमएसके प्रसाद म्हणाले.


दिनेश कार्तिकला संधी दिली असली तरी ऋषभ पंतकडे प्रतिभा आहे. तसंच त्याच्याकडे बराच वेळ आहे, असा विश्वास एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केला.


टीममध्ये तीन स्पिनर का?


वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या तीन स्पिनरना संधी देण्यात आली आहे. याबद्दलही प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिलं. 'मागच्या वर्ष-दीड वर्षामध्ये कुलदीप आणि युझवेंद्र चहलने भारताला सामने जिंकवून दिले आहेत. पण परिस्थितीनुसार तुम्हाला टीममध्ये अधिकच्या ऑलराऊंडरचीही गरज पडू शकते. रवींद्र जडेजा यासाठी पर्याय ठरू शकतो. वर्ल्ड कपच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये खेळपट्ट्या कोरड्या होऊ शकतील, तेव्हा जडेजा फायदेशीर ठरेल, म्हणून जडेजाला संधी देण्यात आल्याचं प्रसाद यांनी सांगितलं.


चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार?


'चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मधल्या फळीमध्ये आम्ही बऱ्याच खेळाडूंना संधी दिली. यामध्ये दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांचाही समावेश होता. रायुडूलाही बऱ्यापैकी संधी देण्यात आल्या. पण विजय शंकर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्येही योगदान देऊ शकतो. इंग्लंडमधलं ढगाळ वातावरणही शंकरच्या मध्यमगती स्विंग बॉलिंगला अनुकूल ठरेल, यासाठीच शंकरची निवड झाली. विजय शंकर, दिनेश कार्तिक आणि केदार जाधव हे आमचे चौथ्या क्रमांकासाठीचे पर्याय आहेत. पण आम्ही सध्यातरी विजय शंकरचा चौथ्या क्रमांकासाठी विचार करत आहे', असं वक्तव्य प्रसाद यांनी केलं.


मोठ्या स्पर्धेसाठी ३ फास्ट बॉलर पुरतील?


वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी भारताला ३ फास्ट बॉलर पुरतील का असा सवाल प्रसाद यांना विचारण्यात आला. 'या ३ फास्ट बॉलरबरोबरच हार्दिक पांड्या आणि विजय शंकर हेदेखील बॉलिंग करु शकतात. तसंच दोन स्पिनरसोबत केदार हादेखील आहे. आमच्याकडे बॉलिंगसाठी ७ पर्याय उपलब्ध आहेत,' असं उत्तर प्रसाद यांनी दिलं.


...तरच राहुलला संधी


केएल राहुलची निवड तिसरा ओपनर म्हणून केली आहे. रोहित आणि शिखर धवन हेच ओपनिंगला खेळतील, पण टीम प्रशासनाला वाटलं तर ते राहुलला खेळवतील, अशी प्रतिक्रिया एमएसके प्रसाद यांनी दिली.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजवेळीच टीम जवळपास निश्चित झाली होती. त्यामुळे आयपीएलमधल्या कामगिरीचा विचार करण्यात आला नाही. आयपीएलमधल्या कामगिरीचा विचार केला असता तर मयंक अग्रवाल, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे युवा खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत, असं प्रसाद म्हणाले. 


अशी असणार भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर