मॅनचेस्टर : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. न्यूझीलंडने ठेवलेल्या २४० रनचा पाठलाग करताना टीम इंडिया ४९.३ ओव्हरमध्ये २२१ रनवर ऑल आऊट झाली. यामुळे टीम इंडियाचा १८ रननी पराभव झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला सुरुवातीलाच धक्के बसले. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली प्रत्येकी १-१ रनवर आऊट झाले. पण धोनी आणि जडेजाने पुन्हा एकदा भारताच्या आशा पल्लवीत केल्या. रवींद्र जडेजाने ५९ बॉलमध्ये ७७ रनची अफलातून खेळी केली. तर धोनीने ७२ बॉलमध्ये ५० रन केले.


टीम इंडियाची अवस्था एकवेळ २४-४ अशी झाली होती. पण ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी ३२ रनची खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरायला मदत केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट आणि मिचेल सॅन्टनरला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं. लॉकी फर्ग्युसन आणि जेम्स निशमला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


न्यूझीलंडने लागोपाठ दुसऱ्यांदा वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठली आहे. याआधी २०१५ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. पण फायनलमध्ये त्यांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये जी टीम जिंकेल त्यांचा न्यूझीलंडबरोबर सामना होईल.


न्यूझीलंडचं २४० रनचं आव्हान


ही मॅच जिंकण्यासाठी न्यूझीलंडने भारतापुढे २४० रनचं आव्हान ठेवलं. काल पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर आज राखीव दिवशी न्यूझीलंडने दिवसाची सुरुवात ४६.१ ओव्हरमध्ये २११/५ एवढ्या स्कोअरवर केली. पण रवींद्र जडेजाच्या जबरदस्त फिल्डिंगमुळे न्यूझीलंडला दोन धक्के बसले. जडेजाने पहिले रॉस टेलरला रन आऊट केलं आणि मग बाऊंड्री लाईनवर टॉम लेथमचा शानदार कॅच पकडला. टेलर ७४ रनवर माघारी परतला. भारतीय बॉलरनी आज फक्त एक फोर दिली. न्यूझीलंडने ५० ओव्हरमध्ये २३९/८ एवढा स्कोअर केला.


भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३ विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. रॉस टेलरशिवाय न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने अर्धशतक केलं. केन विलियमसन ६७ रन करून आऊट झाला.