World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या अंतिम-१५ खेळाडूंची घोषणा
३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला फक्त १० दिवस बाकी आहेत.
मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला फक्त १० दिवस बाकी आहेत. २३ तारखेपर्यंत प्रत्येक टीमला त्यांच्या अंतिम १५ खेळाडूंची घोषणा करायची आहे. पाकिस्तानने याआधी आपल्या टीममध्ये बदल केले आहेत. पाकिस्तानने फास्ट बॉलर मोहम्मद आमिर आणि वहाब रियाज यांचा टीममध्ये समावेश केला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १८ एप्रिलला १५ सदस्यीय टीमची घोषणा केली होती. मोहम्मद आमिर आणि वहाब रियाज आधी घोषित केलेल्या टीममध्ये नव्हते. मोहम्मद आमिरची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. आता पाकिस्तान टीमने आबिद अली आणि जुनैद खान यांना बाहेर करून आसिफ अली आणि आमिरला टीममध्ये घेतलं. तर फहीम अशरफच्या जागी वहाब रियाजची निवड करण्यात आली.
'इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानच्या बॉलरनी निराशाजनक कामगिरी केली. यामुळे आम्ही टीममध्ये बदलाव केले. वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या मॅच या बॅटिंगला अनुकूल असणाऱ्या खेळपट्ट्यांवर होतील', असं निवड समितीचे अध्यक्ष इंजमाम उल हक म्हणाले.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये ४ मॅच पाकिस्तानने गमावल्या, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली. या सीरिजच्या प्रत्येक मॅचमध्ये इंग्लंडने ३५० पेक्षा जास्त रन केले. यानंतर पाकिस्तानच्या बॉलवर जोरदार टीका झाली.
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम
सरफराज अहमद (कर्णधार), आसिफ अली, बाबर आझम, फखर जमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसैन, शादाब खान, शाहिन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाज