World Cup 2019 : सामना इंग्लंड-न्यूझीलंडचा, पण टेन्शन पाकिस्तानला
्रिकेट वर्ल्ड कपची पहिली फेरी जशी शेवटच्या आठवड्यात येऊन पोहोचली आहे
चेस्टर-ले-स्ट्रीट : क्रिकेट वर्ल्ड कपची पहिली फेरी जशी शेवटच्या आठवड्यात येऊन पोहोचली आहे, तसा स्पर्धेचा रोमांच वाढला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेला सामना हा या वर्ल्ड कपमधला अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. फक्त इंग्लंड आणि न्यूझीलंडच नाही तर पाकिस्तानचं भवितव्यही या सामन्यावर अवलंबून आहे.
या मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव झाला तर पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग सोपा होईल. आज इंग्लंडचा पराभव झाला आणि पाकिस्तानने बांगलादेशला हरवलं तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.
दुसरीकडे इंग्लंडने आजचा सामना जिंकला तर पाकिस्तानचे सेमी फायनलमध्ये प्रवेशाचे दरवाजे जवळपास बंद होतील. या परिस्थितीमध्ये पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर इंग्लंडला न्यूझीलंडला २२५-२५० रननी हरवावं लागेल आणि पाकिस्तानलाही बांगलादेशविरुद्ध एवढ्याच रननी विजय मिळवावा लागेल, तरच पाकिस्तान सेमी फायनलमध्ये प्रवेश करु शकते. पण ही शक्यता सध्या तरी अत्यंत धुसर दिसत आहे.
सेमी फायनलचं चित्रही स्पष्ट होणार
आजच्या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला तर सेमी फायनलचं चित्रही स्पष्ट होईल. इंग्लंडने विजय मिळवला तर ते पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर राहतील. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये स्पर्धा असेल. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय झाला तर ते पहिल्या क्रमांकावर राहतील. पण ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत व्हावं लागलं आणि भारताने श्रीलंकेचा पराभव केला, तर मात्र भारत पहिल्या क्रमांकावर राहिल.
सेमी फायनलमध्ये पहिल्या क्रमांकाच्या टीमचा सामना चौथ्या क्रमांकाच्या टीमशी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या टीमचा सामना तिसऱ्या क्रमांकाच्या टीमशी होईल. ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर, भारत दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर राहिले तर सेमी फायनलचा सामना ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आणि भारत-इंग्लंड यांच्यात होईल.
दुसऱ्या गणितानुसार भारत पहिल्या क्रमांकावर, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर, इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर राहिले तर सेमी फायनल भारत-न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये होईल.