लंडन : क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. गुरुवारी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली मॅच झाली. या मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला हरवलं, तर शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्ल्ड कपची ओपनिंग सेरेमनी बुधवारी लंडनच्या बकिंगहम पॅलेसजवळ लंडन मॉल इथे पार पडली. या कार्यक्रमाला इंग्लंडची राणी एलिजाबेथ यांच्यासह सगळ्या देशांचे कर्णधार आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. राणी एलिजाबेथ यांनी सगळ्या कर्णधारांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. पण या ओपनिंग सेरेमनीनंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खानला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.


इंग्लंडची राणी एलिजाबेथसोबत फोटो काढताना ९ देशांचे कर्णधार शर्ट-पँट आणि सूट घालून आले होते. पण फक्त पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खान हा सलवार-कमीज आणि जॅकेट घालून आला होता. यानंतर सरफराज खानवर सोशल मीडियातून निशाणा साधण्यात आला.


या सगळ्या टीकेनंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खानने स्पष्टीकरण दिलं आहे. सलवार-कमीज हा पाकिस्तानचा राष्ट्रीय पोषाख आहे. बोर्डाकडूनच मला असे कपडे घालण्याचे आदेश देण्यात आले होते. मी पाकिस्तानच्या पोषाखाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. इतर देशांच्या कर्णधारांनी सूट घातले होते, पण मी पाकिस्तानचा राष्ट्रीय पोषाख परिधान केला होता, याचा मला अभिमान वाटत होता, अशी प्रतिक्रिया सरफराज खानने दिली.