मँचेस्टर : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. यानंतर आता भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी मौन सोडलं आहे. टीममध्ये कमतरता राहिल्याचं शास्त्रींनी मान्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून टीम इंडियाचे सलामीवीर सातत्याने चांगली कामगिरी करत होते. पण मधल्या फळीतील खेळाडूंना फारशी चांगली खेळी करण्यात अपयश आलं. सलामीवीरांच्या खेळाच्या जोरावर आणि बॉलर्सच्या भेदक माऱ्यामुळे टीमने सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. पण सेमी फायनलमध्ये मधल्या फळीत भरोशाचा खेळाडू नसल्याने टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात आले. वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून मधल्या फळीत विशेष करुन चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूची चर्चा सुरु होती. अखेरपर्यंत त्या क्रमांकावर खेळणारा खेळाडू टीम मॅनेजमेंटला सापडला नाही. 


काय म्हणाले शास्त्री ?


बॅटिंगच्या मधल्या फळीत मोठ्या प्रमाणात बॅट्समनची कमतरता होती, जे आम्हाला महागात पडलं, अशी प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला दिली. आम्हाला मधल्या फळीत विश्वासू बॅट्समनची गरज होती, पण आता हा मुद्दा आगामी मालिकांसाठी महत्त्वाचा झाला आहे, असं शास्त्री म्हणाले.


'मधल्या फळीत कोणाला खेळवायचे? या प्रश्नाने आम्हाला पेचात टाकले होते. या पेचातून आम्हाला मार्ग काढता आला नाही. केएल राहुल चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत होता, पण तेव्हाच शिखर धवन दुखापतग्रस्त झाला. यानंतर या ठिकाणी विजय शंकरला संधी दिली. परंतु तो देखील दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे हा पेच आम्हाला सोडवता आला नाही', अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.


टीम मॅनेजमेंटने मयांक अग्रवालचा ओपनर म्हणून विचार केला होता का? ज्यामुळे केएल राहुलला मधल्या फळीत संधी मिळाली असती. या प्रश्नावर शास्त्री म्हणाले की, 'मयंक टीममध्ये येण्यापर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे आमच्याकडे फारसा वेळ नव्हता. सेमी फायनलच्या आधी जर आमच्याकडे एक मॅच जर असती, तर आम्ही नक्कीच हा प्रयोग केला असता. जेव्हा मयंक लंडनला आला त्या दरम्यान केएल राहुल दमदार कामगिरी करत होता. आम्हाला आणखी एक मॅच खेळण्याची संधी मिळाली असती तर आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करु शकलो असतो', असं वक्तव्य रवी शास्त्रींनी केलं.