मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला. याचसोबत भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचं विजयाचं रेकॉर्ड कायम ठेवलं. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात झालेल्या या मॅचमध्ये भारताचा ८९ रननी विजय झाला. यानंतर सचिन तेंडुलकरने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर निशाणा साधला. या मॅचमध्ये सरफराज हा गोंधळलेला दिसला. पाकिस्तानच्या टीममध्ये कोणताही विचार दिसला नाही, असं सचिन म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया टुडेशी बोलताना सचिन म्हणाला, 'या मॅचमध्ये सरफराज गोंधळला होता. वहाब रियाज बॉलिंग करत असताना त्याने शॉर्ट मिडविकेटवर फिल्डर ठेवला होता. यानंतर शादाब खान बॉलिंगला आला तेव्हा स्लिपमध्ये फिल्डर ठेवण्यात आला. अशा परिस्थितीमध्ये लेग स्पिनरला बॉल पकडणं मुश्किल असतं, जेव्हा योग्य लाईन आणि लेंथवर तुम्ही बॉलिंग करत नाही. मोठ्या मॅचमध्ये खेळण्याची ही पद्धत नाही. पाकिस्तान विचार करुन खेळतंय असं वाटत नव्हतं.'


'पाकिस्तानच्या कोणत्याच बॉलरने वातावरण आणि परिस्थितीचा फायदा उचलला नाही. भारताच्या विकेट पाकिस्तानी टीमच्या रणनितीमुळे गेल्या नाहीत. बॉल जर हलत नसेल तर तुम्ही ओव्हर द विकेट बॉलिंग सुरू ठेवू शकत नाही. वहाबने विकेटच्या आजूबाजूला बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा वेळ निघून गेली होती', अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.