साउथम्पटन : वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ११ रननी निसटता विजय झाला. या लढतीत भारताचे बॅट्समन नापास झाले तर भारतीय बॉलर पास झाले असं म्हणावं लागेल. अफगाणविरुद्ध भारतीय बॅट्समननी अर्ध्याहून अधिक बॉलवर रनच घेतल्या नाहीत. भविष्यात भारतीय बॅट्समनना ही चूक नक्कीच परवडणारी नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताची बॅटिंग मजबूत असल्याचं आपण नेहमीच मोठ्या अभिमानाने सांगतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बाब आपण अभिमानाने मिरवतोही. मात्र याच बॅट्समननी भारतावर नामुष्कीची वेळ आणून ठेवली होती. तर ज्यांना आपण इतरांच्या तुलनेत कमकुवत मानतो त्या बॉलरनी अफगाणविरुद्ध आपली लाज राखली.


रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या अशी मोठमोठी नावं बॅटिंगमध्ये आपल्याकडे आहेत. मात्र अफगाणविरुद्ध या मोठ्या बॅट्समनना दादा बॅटिंग करण्यात अपयश आलं. रोहितला मुजीब रहमानच्या बॉलचं आकलनच झालं नाही आणि तो केवळ एक धाव काढून आऊट झाला. वर्ल्ड कपमध्ये सलामीला आपला दुसराच सामना खेळत असलेल्या केएल राहुलनं खेळपट्टीवर जम बसवायलाच वेळ घेतला आणि तिथेच भारताचा पाया कमकुवत झाला.


कोहलीही निर्णायक खेळी किंवा शतकी खेळी करण्यात अपयशी ठरला. धोनी तर एवढा हळू खेळला की तू आपला कसोटीच खेळ असा सल्ला आता नेटीझन्स त्याला देऊ लागलेत. नेहमीच आडवे-तिडवे फटके मारून रन होत नाहीत हे पांड्याला अफगाणच्या बॉलरनी शिकवलं. तर केदारलाही मोक्याच्या क्षणी विकेट गमावून चालत नाही याचा धडा मिळाला असेल. अफगाणविरुद्ध भारतानं १५१ बॉलवर रनच घेतल्या नाहीत. म्हणजे जवळपास ५१ टक्के बॉल आपण वाया घालवले.


याउलट दबावाखाली बॉलरनी कौतुकास्पद कामगिरी केली. संकटकाळी भेदक आणि अचूक मारा कसा करावा हे त्यांनी इतर टीमना आपल्या खेळीतून दाखवून दिलं. दुखापतग्रस्त भुवनेश्वरऐवजी शमीला टीममध्ये स्थान मिळालं आणि त्याने पहिल्याच सामन्यात हॅटट्रीक साधली. चेतन शर्मानंतर वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक साधणारा शमी दुसरा भारतीय ठरला. शमीनं चार गडी बाद करत भारतीयांना निश्वास सोडायला लावला.


बुमराहनं एकाच ओव्हरमध्ये दोन बळी घेत सामना भारताच्या पारड्यात वळवला. बुमराहलाच सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. चहल, पांड्यानं प्रत्येकी दोन गडी बाद करत भारतीय बॉलिंग अचूक मारा करत असल्याचं दाखवून दिलं. भारतीय बॉलरनी अफगाण फलंदाजांना जखडून ठेवलं. चाहत्यांकडून बॅट्समनच्या तुलनेत नेहमीच झुकत माप मिळणाऱ्या बॉलरनी आपली भूमिका चोख बजावली आणि भारताला अशक्य वाटणार विजय साकारून दिला.