World Cup : लाईव्ह कॉमेंट्री करताना सौरव गांगुलीचा पाकिस्तानी चाहत्यांवर निशाणा
वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे.
मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. मॅनचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात झालेल्या या मॅचमध्ये भारताचा ८९ रननी विजय झाला. भारताच्या या विजयानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया आणि मिम्सचा पाऊस पडला. पण यासगळ्यामध्ये भारताचा माजी कर्णधार आणि कॉमेंटेटर सौरव गांगुलीच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
मॅच सुरु असताना कॉमेंट्रीदरम्यान माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्क म्हणाला, 'स्टेडियममध्ये चारही बाजूला ब्लू टी-शर्ट आणि भारताचे झेंडे दिसत आहेत. पण हिरवा रंग दिसत नाही'. यावर प्रतिक्रिया देताना सौरव गांगुली म्हणाला, 'हो. मॅचच्या तिकीटांचे दर जास्त असल्यामुळे असू शकतं,' असं म्हणत गांगुलीने पाकिस्तानच्या चाहत्यांवर निशाणा साधला.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या खराब परिस्थितीमधून जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सऊदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी याआधीच सऊदीने ६ अरब डॉलरची मदत पाकिस्तानला केली आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सौदी आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १२ महिन्यांसाठीचा करार झाला होता. सौदीचे क्राऊन प्रिन्स पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना हा करार करण्यात आला.
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्याची भारताची परंपरा कायम आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या एकूण ७ पैकी ७ही मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
भारताविरुद्ध पराभव झाल्यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तान ९व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने या वर्ल्ड कपमध्ये ५ पैकी एका मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली. ३ मॅचमध्ये पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जायचं असेल तर आता पाकिस्तानला उरलेल्या सगळ्या मॅचमध्ये विजय मिळवावा लागेल. सोबतच इतर टीमच्या कामगिरीवरही त्यांचं भवितव्य अवलंबून असेल.
या वर्ल्ड कपमधला भारताचा पुढचा मुकाबला २२ जूनला अफगाणिस्तानविरुद्ध होईल. तर पाकिस्तान २३ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.