World Cup 2019 : वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा पहिला पराभव, इंग्लंड ३१ रननी विजयी
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला पराभव झाला आहे.
बर्मिंघम : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला पराभव झाला आहे. या मॅचमध्ये इंग्लंडने ३१ रनने विजय मिळवला. इंग्लंडने ठेवलेल्या ३३८ रनचा पाठलाग करताना टीम इंडियाला ५० ओव्हरमध्ये ३०६/५ एवढाच स्कोअर करता आला. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. ओपनर केएल राहुल शून्य रनवर आऊट झाला.
राहुलची विकेट गेल्यानंतर रोहित आणि विराटने भारतीय टीमच्या इनिंगला आकार दिला. रोहित शर्मा १०२ रन करुन आऊट झाला. तर विराट कोहलीला ६६ रन करता आले. विराट कोहलीचं हे या वर्ल्ड कपमधलं हे लागोपाठ पाचवं अर्धशतक होतं. याचबरोबर विराटने स्टिव्ह स्मिथच्या रेकॉर्डची बरोबरी केली. २०१५ वर्ल्ड कपमध्ये स्मिथने लागोपाठ ५ अर्धशतकं केली होती.
विराट आणि रोहित शर्माच्या विकेटनंतर मात्र टीम इंडियाचा विजय आणखी कठीण झाला. हार्दिक पांड्याने मात्र फटकेबाजी करत भारताला जवळ नेण्याचा प्रयत्न केला. ऋषभ पंतने ३२ रनची, हार्दिक पांड्याने ४५ रन केले. तर धोनीने नाबाद ४२ आणि केदार जाधवने नाबाद १२ रनची खेळी केली. इंग्लंडकडून लियाम प्लंकेटने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर क्रिस वोक्सला २ विकेट घेण्यात यश आलं.
टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने ५० ओव्हरमध्ये इंग्लंडने ३३७/७ एवढा स्कोअर केला. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या ओपनरनी २२ ओव्हरमध्येच इंग्लंडचा स्कोअर १६० रनपर्यंत पोहोचवला. पण यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी पुनरागमन केलं.
इंग्लंडकडून बेयरस्टोने १०९ बॉलमध्ये १११ रनची खेळी केली. तर बेन स्टोक्सने ५४ बॉलमध्ये ७९ रन केले. जेसन रॉय ५७ बॉलमध्ये ६६ रन करून आऊट झाला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. तरी शेवटच्या काही ओव्हरमध्ये शमीने खराब बॉलिंग केली. ४७व्या ओव्हरमध्ये शमीने १७ रन आणि ४९ व्या ओव्हरमध्ये १५ रन दिले.
मोहम्मद शमीने दिलेल्या या रनची भरपाई जसप्रीत बुमराहने शेवटच्या ओव्हरमध्ये केली. शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त ३ रन दिले. शेवटच्या १० ओव्हरमध्ये इंग्लंडने ९२ रन काढले.
भारताचा तिसरा पराभव
१९९२ च्या वर्ल्ड कपनंतर इंग्लंडने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला आहे. तर भारताचा या १० वर्षांमधला हा वर्ल्ड कपमधला तिसरा पराभव आहे. याआधी २०११ वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने आणि २०१५ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.
इंग्लंडचं आव्हान कायम
या विजयामुळे इंग्लंडचं सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याचं आव्हान अजून कायम आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी इंग्लंडला आता न्यूझीलंडचा पराभव करावा लागणार आहे.