लॉर्ड्स : वर्ल्ड कप २०१९ चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन टीममध्ये आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या फायनलमध्ये पोहोचल्यामुळे क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार आहे. या दोन्ही टीमना आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमवर आयसीसीकडून पैशांचा वर्षाव होणार आहे. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला आयसीसीकडून ४० लाख डॉलर म्हणजेच २७ कोटी ४६ लाख ५० हजार भारतीय रुपये मिळणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने गेल्या वर्ल्ड कपप्रमाणे यंदाही सेमी फायनलमध्ये धडक मारली. पण टीम इंडियाचे आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आले. या पराभवानंतर देखील टीम इंडियाला मोठ्या प्रमाणात रक्कम मिळणार आहे.


आयसीसीकडून साखळी फेरीत मॅच जिंकणाऱ्या प्रत्येक टीमला २७ लाख ४६ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. अफगाणिस्तान ही एकमेव अशी टीम आहे, ज्याला साखळी फेरीतील एकही मॅच जिंकता आली नाही.


टीम इंडियाला आयसीसी एकूण ७ कोटी ५५ लाख २८ हजार रुपये देणार आहे. बाद फेरीत म्हणजेच सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्याने आयसीसी टीम इंडियाला ५ कोटी ४९ लाख ३० हजार रुपये देणार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत ७ मॅच जिंकल्या. या प्रत्येक विजयासाठी २७ लाख ४६ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. तर टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला होता. न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. या रद्द झालेल्या मॅचसाठी टीम इंडियाला १३ लाख, ७३ हजार २५० रुपये मिळतील.