World Cup 2019 : हे फिल्डर यंदा वर्ल्ड कप गाजवणार!
५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.
मुंबई : ५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या, दोन नवीन बॉल आणि छोटी मैदानं, हे सगळं पाहता यावेळी जवळपास बहुतेक मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभी राहणार हे निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फिल्डर मोठी भूमिका बजावणार आहेत. वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या टीममध्ये चित्त्यासारखे चपळ फिल्डर आहेत.
रवींद्र जाडेजाला भारतीय टीममध्ये अखेरच्या ११ खेळाडूंमध्ये किती संधी मिळेल याबाबत काही अंदाज वर्तवण कठीण आहे. मात्र त्याचा वेग आणि चपळता वाखाणण्याजोगी आहे. कॅच घेण्याची आणि बॉल थेट फेकून स्टंप उवडण्याची त्याची शैली चांगली आहे. त्याची उंचावरील कॅच बरोबर टीपण्याची क्षमता पाहता कर्णधार विराट त्याला अखेरच्या ओव्हरमध्ये बाऊंड्रीजवळ उभा करतो.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू नेहमीच उत्तम फिल्डर घडवतात. डेविड वॉर्नरही त्यापैकीच एक. वॉ़र्नरच्या बॅटिंगचं नेहमीच कौतुक होतं, मात्र यामुळे त्याची अफलातून फिल्डिंग मात्र झाकोळली जाते. तो मुसंडी मारून बॉलवर नियंत्रण मिळवू शकतो. रन आऊट करण्यात तो माहिर आहे. संपूर्ण सामन्यात तो मैदानाच्या कोणत्याही जागेवर असला तरी सतत धावत बॉलचा पाठलाग करु शकतो.
इंग्लंडचा २७ वर्षीय बेन स्टोक्स हा उत्तम फिल्डर आहे. त्याने क्रिकेटच्या प्रत्येक स्वरुपात शानदार कॅचेस घेतले आहेत. मुसंडी मारून मैदानावर आपटल्यावरही त्याची चेंडूवरील पकड काही ढिली होत नाही हे विशेष. जर इंग्लंडमधील वातावरण थंड असेल तर त्याची फिल्डिंग अधिकच बहरण्याची शक्यता आहे.
आंद्रे रसेलची तंदुरुस्ती आणि त्याची धावण्याचा वेग अगदी बॉललाही मागे टाकेल असा आहे. बॉल जर रसेल उभा असलेल्या परिसरातील २० यार्डामध्ये असेल तर रसेल लगेच त्या बॉलकडे झेपावतो आणि आपले बलदंड हात पसरवत बॉल आपल्या ताब्यात घेतो.
दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसिस हा जरी मध्यला फळीचा फलंदाज तर आहेच याचबरोबर तो एक उत्तम फिल्डरही आहे. रग्बी हा त्याचा आवाडता खेळ आहे. यामुळे मुसंडी मारणे, पडणे, धावणे, बॉलचा पाठलाग करणे हे त्याच्यासाठी काही नवीन नाही. ३० यार्डावरून चेंडू बरोब्बर स्टंपवर मारण्यात तो तरबेज आहे. डुप्लेसिसच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला अजून एक उत्कृष्ट फिल्डर लाभला आहे.