मुंबई : वर्ल्ड कपसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय टीममधून अंबाती रायुडू आणि ऋषभ पंतला वगळण्यात आलं. निवड समितीच्या या निर्णयावर वाद निर्माण झाला होता. यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने त्याचं मत मांडलं आहे. 'वर्ल्ड कपसाठी निवड झालेली भारतीय टीम संतुलित आहे. टीम निवड करणं सोपं नसतं. कितीतरी पर्याय असतात आणि खूप ताळमेळ बसवावा लागतो. अशावेळी काही जागांबाबत वाद होणारच. मात्र निवडण्यात आलेला संघ चांगला असून ते चांगली कामगिरी करतील', असं द्रविड म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप वेळचं आणि इंग्लंडमधलं आत्ताचं वातावरण यामध्ये खूप फरक पडला आहे. इंग्लंडमधील वातावरण आता खूप बदललं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय टीम विजयी कामगिरी करून मायदेशी परतेल, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला आहे.


याआधी १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप झाला होता. तो राहुल द्रविडचा पहिला वर्ल्ड कप होता. तेव्हाचं इंग्लंडमधलं वातावरण आणि खेळपट्ट्या आणि सध्याचं वातावरण आणि खेळपट्ट्या खूप बदलल्या आहेत. आता तुम्ही इंग्लंडमध्ये बॉल स्विंग होईल, अशी अपेक्षा ठेवू शकत नाही. या खेळपट्ट्या आता बॅट्समनसाठी अनुकूल झाल्या आहेत. त्यामुळे मोठे स्कोअर होतील, असं भाकित द्रविडने वर्तवलं आहे.


१९९९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये भारत सुपर सिक्समध्ये पोहोचला होता. या वर्ल्ड कपमध्ये द्रविड भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. यानंतर २००३ सालच्या वर्ल्ड कपमध्ये द्रविड भारताचा उपकर्णधार आणि २००७ वर्ल्ड कपमध्ये कर्णधार होता.