World Cup 2023 AB de Villiers ahead of India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला मिस्टर 360 डिग्री म्हणजेच ए. बी. डिव्हिलियर्सने भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 स्पर्धेबद्दल एक सूचक विधान केलं आहे. भारत आणि ए. बी. डिव्हिलियर्सचा देश असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये रविवारी होणाऱ्या सामन्याआधीच त्याने हे विधान केलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ 5 नोव्हेंबर रोजी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सच्या मैदानावर आमने-सामने येणार आहे. भारत सेमीफायनलसाठी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 302 धावांनी विजय मिळवून आधीच पात्र ठरला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पात्र ठरण्याची शक्यता 95 टक्क्यांपर्यंत आहे. अशातच ए. बी. डिव्हिलियर्सचं हे विधान समोर आलं आहे.


भारताचा उल्लेख करत डिव्हिलियर्सचं विधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रिमिअर लिगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातून खेळणाऱ्या डिव्हिलियर्सने यंदाचा वर्ल्ड कपच्या संभाव्य विजेत्याबद्दल भाष्य केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम सामन्यापर्यंत जाण्यास अपयशी ठरला तर यंदाचा वर्ल्ड कप भारताने जिंकावा असं डिव्हिलियर्स म्हणाला आहे. भारतीय संघ हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आपल्या स्वत:च्या देशानंतरचा दुसरा फेव्हरेट संघ का आहे याची कारणही डिव्हिलियर्सने सांगितली आहे. भारतीय संघामध्ये मोठ्याप्रमाणात मॅच विनर खेळाडू आहेत. तसेच भारतीय संघ घरच्या मैदानांवर सामने खेळत असल्याने त्याचाही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला फायदा होईल, याच 2 प्रमुख कारणांसाठी भारत आपला फेव्हरेट संघ असल्याचं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे. 


नक्की वाचा >> 'मॅच संपल्यानंतर मला श्रीलंकन संघाचा...'; भारताच्या महाकाय विजयानंतर आनंद महिंद्रांची कमेंट


डिव्हिलियर्स नेमकं काय म्हणाला?


आयसीसीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये डिव्हिलियर्सने, "ते (भारतीय संघ) नक्कीच माझ्या आवडत्या संघांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे. दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कप जिंकता आला नाही तर त्यांनी चषक जिंकावा असं मला वाटतं. तो माझा आवडता संघ आहे कारण त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. तो फार उत्तम संघ आहे. त्या संघात अनेक मॅच विनर्स आहेत. त्यांना इथल्या परिस्थितीचा चांगला अंदाज आहे. तसेच ते घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत आहेत," असं म्हटलं आहे.


नक्की वाचा >> दक्षिण आफ्रिकेनं भारताला डिवचलं! म्हणाले, 'आम्ही भारताला भारतातच...'


कोणत्याही संघासाठी धोकादायक


"हे सारं 2011 सारखं आहे. मला मैदानामध्ये सर्वजण आपल्या मोबाईलच्या टॉर्च लावून जल्लोष करताना दिसत आहेत," असंही डिव्हिलियर्स म्हणाला. "क्रिकेटमधील अनिश्चितता पाहिली तर भारत सध्या चांगली कामगिरी करत असला तरी अचानक संघ बॅकफूटवर जाण्याची शक्यता असते असं डिव्हिलियर्स म्हणाला. चुकीच्या वेळी असा फटका बसणं कोणत्याही संघासाठी धोक्याचं ठरु शकतं," असं डिव्हिलियर्स म्हणाला. अनेक गोष्टी भारताच्या बाजूने असल्याने ते वर्ल्ड कपचे प्रमुख दावेदार आहेत असं डिव्हिलियर्स म्हणाला.


नक्की वाचा >> क्रिकेटच्या इतिहासात 48 वर्षात पहिल्यांदाच 'असं' घडलं की...; मुंबईकर ठरले साक्षीदार


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


सर्व काही योग्य घडतंय पण...


कधी काहीही घडू शकत असं म्हणत डिव्हिलियर्सने भारतीय संघाला सूचक इशारा दिला आहे. "भारतासाठी सर्वकाही योग्य घडत आहे. मात्र खेळात कायम गोष्टी अशाच घडतात असं नाही. हिच खेळाची दुसरी बाजू आहे. तर काय होईल? याचं कायमच टेन्शन असतं. कोणीतरी जखमी होईल किंवा कदाचित आपल्यासाठी एखादा दिवस वाईट असेल. खेळात अनेक गोष्टी घडू शकतात. मात्र हेच या खेळाचं सौंदर्य आहे. हा खेळ अंदाज बांधता येण्यासारखा नाही. अनेक गोष्टी भारताच्या बाजूने दिसत असल्या तरी त्या ठराविक दिवशी काहीही घडू शकतं. मात्र खरोखरच ते वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फेव्हरेट आहेत. ते वर्ल्ड कप जिंकतील असं वाटण्यासाठी अनेक कारणं त्यांच्या बाजूने आहेत, असेच म्हणावे लागेल," असं डिव्हिलियर्सने स्पष्ट केलं.