India Beat Pakistan Danish Kaneria Post: पाकिस्तानचा माजी क्रिकेपटू दिनेश कनेरियाने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप 2023 च्या संघामधील विकेटकिपर बॅट्समन मोहम्मद रिझवानला टोला लगावला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये पाकिस्तानचा संघ पराभूत झाल्यानंतर दिनेश कनेरियाने इस्रायल-गाझा वादाच्या पार्श्वभूमीवर रिझवानला सुनावलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून देणारी खेळी केल्यानंतर रिझवानने आपलं शतक गाझामधील लोकांना समर्पित केल्याचं म्हटलं होतं. मात्र पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाल्यानंतर कनेरियाने तशास तास रिप्लाय करत रिझवानचे कान टोचले आहेत.


रिझवानची वादग्रस्त पोस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यानच्या सामन्यामध्ये 345 धावांचा पाठलाग पाकिस्तानने यशस्वीपणे केला. 6 विकेट्स आणि 10 चेंडू शिल्लक असतानाच पाकिस्तानने 345 धावा करत सामना खिशात घातला. या सामन्यात मोहम्मद रिझवान 131 धावा करुन नाबाद राहिला. सामना जिंकल्यानंतर मोहम्मद रिझवानने, "हा विजय गाझामधील बंधू-भगिनींसाठी समर्पित करतो," असं ट्वीट केलं होतं. भारताविरुद्ध मोहम्मद रिझवनला अर्धशतकही झळकावता आलं नाही. संघाला मोहम्मद रिझवानच्या चांगल्या खेळीची गरज असतानाच रिझवानला 49 धावांवर जसप्रीत बुमराहने क्लिन बोल्ड केलं.


नक्की वाचा >> भारताच्या विजयानंतर इस्रायलने उडवली पाकची खिल्ली! म्हणाले, 'पाकिस्तानला हमासच्या दहशतवाद्यांना...'



कान्हेरीयाने खोचक विधान


शनिवारी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तानचा भारताने मानहानीकारक पराभव केला. या पराभवामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून भारताने थेट पहिल्या स्थानी झेप घेतली. भारताच्या या विजयानंतर दिनेश कनेरियाने खोचक विधान केलं आहे. देव कधीच अशा लोकांबरोबर नसतो जे हिंसेचं समर्थन करतात, असं कनेरिया म्हणाला आहे. दिनेश कनेरियाने ट्वीटरवरुन, "पुढच्या वेळेस तुमचा विजय मानवतेला समर्पित करा. देव कधीच हिंसेचं समर्थन करत नाही," असं म्हटलं आहे. त्याने भारत विरुद्ध पाकिस्तान असा हॅशटॅगही ट्वीटमध्ये वापरला आहे. 



भारताची 8-0 ची आघाडी


पाकिस्तानच्या संघाने भारताविरुद्ध चांगली सुरुवात केली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानचा संघ 155 धावांवर 2 बाद अशा स्थितीमध्ये होता. पाकिस्तानचा संघ भारतासमोर किमान 300 हून अधिक धावांचं टार्गेट देईल असं वाटत असतानाच पाकिस्तानची फलंदाजी गडगडली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 191 धावांवर निर्धारित 50 ओव्हर खेळण्याआधीच तंबूत परतला. भारताने जवळपास साडेतीनच्या सरासरीने धावांचा पाठलाग करण्याची आवश्यकता असताना कर्णधार रोहित शर्माने दमदार खेळी केली. 86 धावा करुन रोहित बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरने संयमी अर्धशतक झळकावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्बत केलं. वर्ल्ड कप स्पर्धेमधील भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा 8 वा विजय ठरला. पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत एकदाही भारताला पराभूत करता आलेलं नाही. भारताने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अपराजित राहण्याचा विक्रम 8-0 च्या फरकाने अधिक भक्कम केला आहे.