भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मोहम्मद शमीने वर्ल्डकपमधील 3 सामन्यात 14 विकेट्स घेत एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 14 विकेट्स घेणारा मोहम्मद शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सनेही त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वचषक 2023 च्या मोहिमेतील मोहम्मद शमीची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. वर्ल्डकपमधील तिन्ही फॉरमॅटमधील 13 सामन्यांमध्ये 14.07 च्या सरासरीने आणि केवळ 5 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटसह त्याने 40 विकेट्स घेतले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताने 302 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवल. या विजयात मोहम्मद शमीने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. मोहम्मद शमीने एकूण 5 विकेट्स घेतले. शमीने इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा विश्वचषकात 4 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मिचेल स्टार्क आणि इम्रान ताहिर यांना मागे टाकले आहे.


इंग्लंडविरोधातील सामन्यात मोहम्मद शमीने बेन स्टोक्सला बोल्ड केलं होतं. मोहम्मद शमीने बेन स्टोक्सला 10 धावात तंबूत पाठवलं होतं. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बेन स्टोक्सने मोहम्मद शमीचं तोंडभरुन कौतुक केलं. तो कोणत्याही स्थितीत विकेट मिळवतो असं बेन स्टोक्सने म्हटलं. 


"मी शमीविरोधात फार क्रिकेट खेळलो असून तो एक उत्तम खेळाडू आहे. आम्ही काल रात्री सामना पाहिला. त्यांनी विश्वचषकात एक अप्रतिम स्थिती आणली हे खरोखरच विलक्षण आहे, तो या वर्ल्डकपमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे यात काही वाद नाही. मला वाटत नाही की त्याने प्रत्येक सामना खेळला आहे, परंतु तो ज्या पद्धतीने खेळला आहे, प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक गेममध्ये त्याने किती विकेट घेतल्या आहेत हे अविश्वसनीय आहे," असं बेन स्टोक्सने म्हटलं आहे. 


"त्याने विकेट्स मिळवण्याचा मार्ग शोधला आहे. आमच्याविरोधात त्याने केलेली गोलंदाजी त्याच्या चांगल्यांपैकी एक होती. कधीतरी तुम्ही विरोधी संघाला फार चांगले आहात असं सांगता. मोहम्मद शमी या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत फार चांगला खेळला आहे," असं बेन स्टोक्सने सांगितलं.