वर्ल्डकप स्पर्धा सुरु असतानाच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल जखमी झाला आहे. यामुळे सोमवारी अहमदाबाद येथे होणाऱ्या इंग्लंडविरोधातील सामन्याला तो मुकणार आहे. ही घटना घडली तेव्हा मॅक्सवेल गोल्फ कार्टवर होता. मॅक्सवेल क्लब हाऊसमधून टीम हॉटेलकडे परत जात होता. यानंतर मॅक्सवेलची पकड सुटली, आणि घसरुन तो कार्टमधून खाली पडला. यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याच्या डोक्याला जबर इजा झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅक्सवेल जखमी होणं ऑस्ट्रेलिया संघासाठी डोकेदुखी ठरु शकते. सलग पराभवांनंतर ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्डकपमध्ये दमदार पुनरागमन केलं असून, सेमी-फायनलमध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे मॅक्सवेलची दुखापत ऑस्ट्रेलिया संघासाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान मॅक्सवेलच्या जागी कॅमेरून ग्रीन आणि मार्कस स्टॉइनिस हे पर्याय आहेत. 


"त्याला क्लबहाऊसमधून संघाच्या बसमध्ये परत आणताना, ग्लेन मॅक्सवेल कारच्या मागून उतरला आणि त्याला एक छोटीसी दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पुढील कालावधीसाठी उपचार घेईल आणि दुर्दैवाने इंग्लंडचा सामना गमावेल," अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी दिली आहे. 


"मॅक्सवेलला 6 ते 8 दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. खरं तर कोणीही त्याची जागा घेऊ शकत नाही. इंग्लंडविरोधातील सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल. आम्हाला संघात काही पर्याय आहेत. मार्कस स्टॉयनिस, कॅमेरॉन ग्रीन असे काही खेळाडू उपलब्ध आहेत, पण आम्ही अद्याप तसा निर्णय घेतलेला नाही," असंही त्यांनी सांगितलं. 


"कार्टवरुन खाली पडल्याने काहीजण जखमी झाले. ग्लेन आणि इतर काही खेळाडूंनी टीम बसमध्ये जात असताना कार्टच्या मागील बाजूला उडी मारली असता पकड सुटली आणि खाली पडून दुखापत झाली. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या जखमेचा आढावा घेतला जात आहे," असाही खुलासा त्यांनी केला. 


पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत 4 सामने जिंकले आहेत. यामुळे ऑस्ट्रेलिया संघ आता उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता आहे. पहिल्या चार संघात ऑस्ट्रेलिया आहे. इंग्लंडविरोधातील सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया जायंट किलर अफगाणिस्तानशी भिडणार आहे.