भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी असल्याने सध्या संघाबाहेर आहे. हार्दिक पांड्याचा घोट्याला दुखापत झाली असून, तो सध्या विश्रांती घेत आहे. दुखापत झाली असल्याने न्यूझीलंड आणि इंग्लंडविरोधातील सामन्यांना हार्दिक पांड्या मुकला असून, त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे. 19 ऑक्टोबरला बांगलादेशविरोधातील सामन्यात आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्या जखमी झाला होता. दरम्यान हार्दिक पांड्या अद्यापही दुखापतीतून सावरलेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या अद्यापही जखमी असल्याने श्रीलंका आणि 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या सामन्यातही तो खेळणार नाही. 12 नोव्हेंबरला भारतीय संघ लीममधील शेवटचा सामना नेदरलँडविरोधात खेळणार आहे. हार्दिक पांड्या या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. बंगळुरुत हा सामना होणार आहे. 


"ही किरकोळ जखम आहे. तो दुखापतीमधून सावरत असून, लीगच्या अखेरच्या सामन्यात पुनरागन करु शकतो. किंवा तो बहुतेक थेट सेमी-फायनल सामनाही खेळू शकतो," अशी बीसीसीआय सूत्रांची माहिती आहे.


भारताने वर्ल्डकपमधील आपले सर्व 6 सामने जिंकले असून, सेमी-फायनलसाठी पात्र झाला आहे. हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याची जागा भरुन काढण्यासाठी संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ 5 गोलंदाजांसह खेळत असून, सूर्यकुमार यादव सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. 


दरम्यान मोहम्मद शमी इतक्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे की, संघाला हार्दिक पांड्याची कमतरता अजिबात भासलेली नाही. पण संघाचा समतोल राखायचा असेल तर हार्दिक पांड्याची गरज आहे. इंग्लंडविरोधातील विजयानंतर गोलंदाज प्रशिक्षक पारस यांनी हार्दिक पांड्या संघात पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. हार्दिक पांड्या बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट स्टेडिअममध्ये उपचार घेत आहे. 


"वैद्यकीय पथक सतत हार्दिकवर लक्ष ठेवत असून त्याच्या आणि एनसीएच्या संपर्कात आहे. काही दिवसांत आम्हाला माहिती मिळेल अशी आशा आहे," असं पारस म्हणाले. दुखापतीनंतर हार्दिक पांड्या लखनऊत इंग्लंडविरोधातील सामन्यात खेळेल असं बीसीसीआयने आधी सांगितलं होतं. पण बीसीसआय कोणतीही जोखीम घेण्यास इच्छुक नसून, हार्दिक पांड्या नैसर्गिकरित्या फिट व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे.