भारताविरोधातील तक्रारीने पाकिस्तान तोंडघशी पडला! ICC म्हणते, `हजारो लोक ओरडत असतील तर...`
World Cup 2023 PCB Complaint Against India to ICC: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केलेल्या तक्रारीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
World Cup 2023 PCB Complaint Against India to ICC: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी पाकिस्तानने भारताविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याची शक्यता मावळली आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला होता. यासंदर्भात आयसीसीकडे अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आली. क्रिकेटमधील भेदभावासंदर्भातील आयसीसीचे नियम हे एखाद्या व्यक्तीसाठी लागू होतात. व्यक्ती समुहांसाठी म्हणजेच ग्रपसाठी हे नियम लागू होत नाहीत. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाखांहून अधिक चाहत्यांच्या उपस्थितीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. केवळ 3 पाकिस्तानी-अमेरिकी चाहते यावेळी मैदानात पाहुण्या संघाचं समर्थन करण्यासाठी उपस्थित होते.
रिझवानविरुद्ध घोषणाबाजी झाल्याचा दावा
या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या एका गटाने मोहम्मद रिझवानची खिल्ली उडवली. मोहम्मद रिझवान बाद होऊन पव्हेलियनमध्ये परत जात असतानाच धार्मिक घोषणाबाजी करण्यात आल्याचा दावा करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तक्रार दाखल केली. क्रिकेट खेळाचे नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या आयसीसीकडे पाकिस्तानने तक्रार दाखल केली. पाकिस्तानी क्रिकेट संघाचे निर्देशक मिकी ऑर्थर यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंवर भारतीय चाहत्यांनी केलेल्या टीप्पण्यांचा परिणाम झाल्याचा दावा केला. पाकिस्तानचा संघ या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत झाला. पाकिस्तानने केलेल्या तक्रारीची दखल आयसीसीने घेतली आहे.
प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेतली जाते
"आयसीसी प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत असते. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचं नेमकं म्हणणं काय आहे मला कळालेलं नाही. मात्र अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करणं कठीण असतं," असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ज्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली त्याने बीसीसीआय आणि आयसीसीसाठी वरिष्ठ पदांवर काम केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. 'अयोग्य वागणूक' ही तक्रार सापेक्षपणे पाहता येईल असं आयसीसीचं म्हणणं आहे.
यालाच प्रेशर म्हणतात...
"वर्णद्वेष असलेली घोषणाबाजी झाली असेल तर आयसीसी अशी घोषणाबाजी करणाऱ्या गर्दीतील लोकांची ओळख पटवू शकते. मात्र हजारो लोक एकाच वेळेस घोषणाबाजी करत असतील तर आम्ही काय करु शकतो? स्टॅण्डमधून कोणत्याही मिसाईल सोडण्यात आल्या नाहीत किंवा त्यामुळे खेळाडू जखमी झाले असंही नाही. चाहत्यांकडून असं काहीतरी होणं अपेक्षित आहे. यालाच खेळाचं प्रेशर म्हणतात," असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
झिरो टॉलरन्स पॉलिसी
वर्णद्वेषी टीका आणि भेदभावाविरोधात आयसीसीची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. याच अंतर्गत कारवाई केली जावी अशी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची अपेक्षा आहे. मात्र असं काहीही होणार नसल्याचं स्पष्ट झालं असून पाकिस्तान या प्रकरणी तोंडघाशी पडला आहे.