`मोहम्मद शमीवर गुन्हा दाखल करु नका`; दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती
World Cup 2023 Mohammed Shami : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात मोहम्मद शमीने तुफान गोलंदाजी करुन विजय खेचून आणला आहे. मात्र सात बळी घेणाऱ्या शमीवर गुन्हा दाखल करु नका अशी विनंती दिल्ली पोलिसांनी केली आहे.
World Cup 2023 Mohammed Shami : भारतीय संघाने न्यूझीलंडवर (IND vs NZ) शानदार विजय मिळवून वर्ल्डकप 2023 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. दुसरीकडे भारताचा वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) केलेल्या घातक गोलंदाजीने सर्वानाच आश्चर्यचकित केलं आहे. सात विकेट काढत शमीने न्यूझीलंडच्या संघाचा धुव्वा उडवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही शमीच्या खेळीचं कौतुक केले आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोहम्मद शमीच्या बाबतीत मुंबई पोलिसांकडे एक विनंती केली होती. त्यावर आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) प्रत्युत्तर दिलं आहे.
मोहम्मह शमीच्या या शानदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर शमी अजूनही ट्रेंडमध्ये आहे. शमीच्या कामगिरीबद्दल, सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करत एक पोस्ट लिहीली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 'मुंबई पोलीस, आम्हाला आशा आहे की आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शमीवर गुन्हा दाखल करणार नाही,' असे दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
मुंबई पोलिसांनीही दिल्ली पोलिसांच्या या पोस्टला तत्काळ प्रत्युत्तर दिल आहे. 'दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मने चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि सहआरोपींची यादीही दिली नाही. प्रिय नागरिकांनो, दोन्ही पोलीस विभागांना भारतीय दंड संहितेची पूर्ण माहिती आहे आणि ग्रेट सेन्स ऑफ ह्यूमरसाठी तुमच्यावर विश्वास आहे, असे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. या पोस्टमधून मुंबई पोलिसांना विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल यांच्याबाबत भाष्य करायचे होते. काही वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.
मोहम्मद शमीने सांगितले गोलंदाजीचं सिक्रेट
दरम्यान, सामना संपल्यानंतर मोहम्मद शमीने त्याला वाटलेल्या भीतीबाबत भाष्य केले. "आम्ही 400 धावांपर्यंत पोहोचलो तेव्हा आमची भंबेरी उडाली होती. कारण खेळपट्टी सोपी दिसत होती. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे आणखी सोपे झाले जाते. संध्याकाळी दव पडल्यामुळं फलंदाजीसाठी पोषक वातावरण होतं. गेल्या दोन्ही सेमी फायनलमध्ये आम्ही पराभूत झालो होतो, मात्र यावेळी सर्वकाही सर्वस्व पणाला आम्ही लावलं होतं. आम्ही शेवटपर्यंत हा सामना सोडला नाही आणि त्यामुळेच आम्ही फायनलमध्ये पोहोचू शकलो. दुसरी चांगली गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचे सलामीवीर जास्त धावा करू शकले नाहीत. त्यांनी चांगली सुरुवात केली असती तर आम्ही अडचणीत येऊ शकलो असतो," असे मोहम्मद शमीने सांगितले.