IND vs PAK : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. एकदिवसीय विश्वचषकाच्या (World cup 2023) इतिहासात पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा धूळ चारली आहे. या सामन्यात भारताने (IND vs PAK) 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या विजयानंतर भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र पाकिस्तानी संघ चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तानच्या पराभवावर संचालक मिकी आर्थर (Mickey Arthur) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या एकतर्फी पराभवानंतर पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी म्हटलं की एक लाख भारतीय समर्थकांसमोर त्यांना नेहमीचा खेळ दाखवता आला नाही. कारण तो भारतीय क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या द्विपक्षीय सामन्यासारखा दिसत होता. विश्वचषक सामन्यासारखा नाही.  आर्थर यांनी यावेळी पाकिस्तानी चाहत्यांना अद्याप विश्वचषकासाठी व्हिसा न दिल्याचा संदर्भही दिला.


आजचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा आयसीसीचा कार्यक्रम आहे असे वाटत नव्हते. तो पूर्णपणे बीसीसीआयच्या कार्यक्रमासारखा दिसत होता. मात्र, मी हे निमित्त म्हणून वापरणार नाही. मी पाकिस्तान असे पुन्हा-पुन्हा मायक्रोफोनवरून ऐकले नाही. या गोष्टींचा परिणाम सामन्याच्या निकालावर होतो, असे मिकी आर्थरने सांगितले. यानंतर त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


अंतिम फेरीत भारताला आव्हान देऊ


नाणेफेक हारल्यानंतर पाकिस्तानी संघ प्रथम फलंदाजीला आला त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत पाकिस्तानला अवघ्या 200 धावांत गुंडाळले. एक लाखाहून अधिक प्रेक्षकांसमोर खेळण्याचे दडपण पाकिस्तानी संघावर स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजांनाही या सामन्यात कोणताही प्रभाव पाडता आला नाही. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेला आलेले पाकिस्तानी संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी भारतीय संघातील खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करतानाच आता अंतिम सामन्यात आपला संघ भारताशी भिडणार असल्याचेही सांगितले.


मला दंड नकोय - मिकी आर्थर


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत चुरशीची होईल, असे मानले जात होते पण तसे झाले नाही. भारताने पाकिस्तानचा एकतर्फी 7 गडी राखून पराभव केला. जेव्हा मिकी आर्थरला विचारण्यात आले की विश्वचषकात पक्षपाती वातावरण असणे योग्य आहे का? यावर ते म्हणाले की, मला वाटत नाही की मी यावर कधीही भाष्य करू शकेन. मला दंड नको आहे.