Ind vs Afg: विराट कट्टर वैऱ्याविरुद्ध पहिल्यांदाच मैदानात उतरणार; अफगाणी कॅप्टन म्हणतो, `असा आक्रमकपणा...`
World Cup 2023 India Vs Afghanistan: भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीकडे आज भारतीय चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे कारण आज तो त्याच्या कट्टर दुश्मनासमोर येणार आहे.
World Cup 2023 India Vs Afghanistan: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज वर्ल्ड कप 2023 मधील आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. नवी दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना भारताने जिंकला असून गोलंदाजांबरोबरच के. एल. राहुल आणि विराट कोहलीच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिला. भारत आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्येही विराट कोहलीच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असेल पण त्याचबरोबर विराट या सामन्यामध्ये त्याचा कट्टर दुश्मन असलेल्या एका खेळाडूसमोर इंडियन प्रिमिअर लीगनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे लोकल बॉय असलेल्या विराट आणि त्याच्या या वैऱ्यामधील हमरीतुमरीही पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानचा नवीन-उल-हकने इंडियन प्रमिअर लीगच्या एका सामन्यामध्ये विराटशी वाद घातल्यापासून हे दोघे कधी आमने-सामने येणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं होतं.
नक्की या दोघांमध्ये घडलेलं काय?
नवीन-उल-हक हा तोच खेळाडू आहे ज्याच्यामुळे रॉयल चँलेंजर्स बंगळुरुकडून खेळणारा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरदरम्यान यंदाच्या म्हणजेच 2023 च्या एका सामन्यानंतर मैदानात वाद झाला होता. विराट कोहली आणि नवीन-उल-हकदरम्यान मैदानात मोठा वाद चांगलाच चर्चेत आला होता. इतकेच नाही तर सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करताना विराट कोहलीचा हात नवीन-उल-हकने झटकला. यावरुन विराटने नीवन-उल-हकला तिथेच झापलं. नंतर या वादात गौतम गंभीरने नवीन-उल-हकची बाजू घेत विराटशी वाद घातला. आता हे दोघे पुन्हा आमने-सामने येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनेही एक सूचक विधान केलं आहे.
अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणाला...
अफगाणिस्तानचा संघ काही वर्षांपूर्वी भारतीय मैदानांना होम ग्राऊण्ड म्हणून वापरायचा. अफगाणिस्तानचे अनेक खेळाडू आयपीएल संघांमधील अविभाज्य भाग आहेत. मात्र त्याचवेळी विराट आणि नवीन-उल-हकमध्ये झालेल्या बाचाबाचीसारख्या प्रकरणांमध्येही अफगाणी खेळू दिसून आले आहेत. याचबद्दल हशमतुल्ला शाहिदीला विराचलं असता त्याने, "हे पाहा तुम्ही यापूर्वीही उल्लेख केला आहे त्याप्रमाणे, भारत आमचं होम ग्राऊण्ड आहे. हे आमचं घर होतं. आम्ही इथे फार क्रिकेट खेळो आहोत. येथील लोकांनी अफगाणी लोकांना फार प्रेम दिलं आहे," असं सांगितलं.
आक्रमकपणावर बोलला कर्णधार
नवीन-उल-हक आणि विराट वादावर भाष्य करताना हशमतुल्ला शाहिदीने, "मैदानात जे घडतं त्यावेळी खेळाडूंमध्ये येणारा आक्रमकपणा हा सर्वच खेळाडूंच्याबाबतीत दिसून येतो. हे केवळ अफगाणिस्तान आणि भारताबद्दल घडतं असं नाही. त्यामुळे असा आक्रमकपणातून घडलेला प्रकार कोणाबरोबरही होऊ शकतो. अशा गोष्टी घडत असतात. भारतीय संघाचा भाग राहिलेले सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यासारखे खेळाडू अफगाणी खेळाडूंचे आदर्श आहेत," असंही म्हटलं.
भारतीय चाहत्यांनी डिवचलं
धर्मशाला येथे खेळवण्यात आलेल्या अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या वर्ल्डकपच्या सामन्यामध्ये भारतीय प्रेक्षकांनी नवीन-उल-हक मैदानात असतानाच कोहली कोहली असा जयघोष करत त्याला डिवचलं होतं. त्यामुळेच आज मैदानात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.