एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून एका फलंदाजाची अनुपस्थिती क्रिकेट विश्वाला प्रकर्षाने जाणवत आहे. स्पर्धा सुरु होणार असतानाच मोक्याच्या क्षणी डेंग्यू झाल्याने पहिल्या दोन्ही सामन्यात भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिल खेळू शकला नाही. प्रचंड फॉर्ममध्ये असणाऱ्या शुभमन गिलकडून भारतीय संघ आणि चाहत्यांना प्रचंड अपेक्षा असताना तो संघाबाहेर असणं अनेकांसाठी निराशाजनक आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानशी भिडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता शनिवारी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणाऱ्या या सामन्यात शुभमन गिल खेळणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शुभमन गिलसाठी हे त्याचं आवडतं मैदान आहे. तिथे त्याच्या नावे चांगला रेकॉर्डही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अहमदाबादमध्ये दाखल झालेल्या शुभमन गिलने सरावात सहभाग घेतला आहे. शुभमन गिल नेटमध्ये सराव करत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे पाकिस्तानविरोधातील सामन्यात शुभमन मैदानात उतरण्याच्या आशा उंचावल्या आहेत. 



बीसीसीआयने सोमवारी अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात शुभमन गिल खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. चेन्नईत तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, आज सकाळीच शुभमन गिल अहमदाबादमध्ये दाखल झाला. 



भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शुभमन गिलच्या आजारपणाची माहिती दिली होती. "तो आता रिकव्हर होत आहे. हो त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण फक्त पूर्वकाळजी म्हणून त्याला रुग्णालयात नेलं होतं. सध्या त्याला वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेण्यात आलं आहे. तो लवकर बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. तो सध्या तरी एकदम ठणठणीत वाटत आहे," असं त्यांनी सांगितलं होतं.



"आमच्याकडे सध्या अनुभवी फलंदाज आहेत. मला वाटत नाही त्यांना काही सांगण्याची गरज आहे. या फॉरमॅटमध्ये नेमकं कसं खेळायचं हे प्रत्येकाला माहिती आहे. फलंदाज फार स्थिर आहेत. प्रत्येकाकडे त्याची खेळण्याची वेगळी पद्धत आहे. त्यांना ज्याप्रकारे खेळायचं आहे तसं खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं जात आहे. तसंच प्रत्येकाची खेळण्याची वेगळी शैली आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आम्ही जे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत ते नक्की मिळवू," असंही विक्रम राठोड म्हणाले आहेत.