Ind vs Pak: `सर्वांना बॅटिंग दिली, असा पाहुणचार हवा`, सेहवागची गुगली; तर जाफर म्हणतो, `लघवी करेपर्यंत...`
India vs Pakistan Virender Sehwag Wasim Jaffer Post: पाकिस्तानचा संघ 155 वर 2 बाद या स्थितीवरुन सर्व बाद 191 पर्यंत पोहचला आणि तो सुद्धा अवघ्या काही षटकांमध्ये.
India vs Pakistan Virender Sehwag Wasim Jaffer Post: भारत आणि पाकिस्तानदरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील सामन्यामध्ये पाहुण्या संघांची चांगली सुरुवात झाल्यानंतर फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोलमडली. पाकिस्तानतर्फे इमाम-उल-हक आणि अब्दुल्लाह शफीक यांनी चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनीही पाकिस्तानी संघाला चांगलं स्थिरता मिळवून दिली. मात्र त्यानंतर पाकिस्तानचा डाव असा गडगडला की केवळ 120 धावांच्या आत पाकिस्तानचे 8 गडी तंबूत परतले. पाकिस्तानच्या या अनाकलनिय फलंदाजीसंदर्भात भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर आणि सलामीवीर विरेंद्र सेहवागने पाहुण्या संघांची टर उडवली आहे.
उत्तम सुरुवात
पाकिस्तानला इमाम-उल-हक आणि अब्दुल्लाह शफीक यांनी 41 धावांची पहिल्या विकेट्ससाठीही पार्टनरशीप केली. त्यानंतर धावसंख्या 73 वर असताना इमाम-उल-हक बाद झाला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने डावाला आकार दिला. बाबर आझमने अर्धशतक झळकावलं. 18.3 ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या संघानं स्कोअरबोर्डवर शतक झळकावलं. सामन्यातील 29 व्या षटकामध्ये पाकिस्तानने 150 धावांचा टप्पा ओलांडला. कर्णधार बाबर आझमने चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर बाबर आझम अर्धशतक करुन तंबूत परतला आहे. 58 चेंडूंमध्ये 50 धावा करुन बाबर बाद झाला. मोहम्मद सिराजने बाबरला बोल्ड केलं.
पाकिस्तानी संघाला घरघर
155 धावांवर बाबर बाद झाल्यानंतर पाकिस्तानी संघाला उतरती कळा लागली. संघ 162 धावांवर असताना सौद शकील, 166 वर असताना इफ्तिकार अहमद बाद झाला. त्यानंतर 168 धावांवर असताना मोहम्मद रिझवान बाद झाला. 171 वर शादाब खान बाद झाला तर 187 वर मोहम्मद नवाज तंबूत परतला. पाकिस्तान 187 धावांवर असताना हसन अली आणि 191 वर हरिस रौफ बाद झाले. पाकिस्तानच्या 6 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
जाफरने शेअर केलं मीम
पाकिस्तानच्या याच पडझडीसंदर्भात वसीम जाफरने एक मीम शेअर केलं आहे. यामध्ये पाकिस्तानी संघ 155 वर 2 गडी बाद अशी स्थिती असताना पाकिस्तानी चाहता लघवीसाठी जातो. तो लघवी करुन परत येतो तोपर्यंत पाकिस्तानचा स्कोअर 191 वर सर्वबाद असा असतो असं हे मीम आहे.
सेहवागनेही केलं ट्रोल
सेहवागनेही पाकिस्तानी संघाला ट्रोल करताना भारतीयांचा पाहुणचार हा असाच असतो असं म्हटलं आहे. सर्व पाहुण्यांना आम्ही फलंदाजीची संधी दिली असं मजेदार विधान सेहवागने केलं आहे.
भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत 7 वेळा आमने-सामने आले असून एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही.