`मॅच संपल्यानंतर मला श्रीलंकन संघाचा...`; भारताच्या महाकाय विजयानंतर आनंद महिंद्रांची कमेंट
Anand Mahindra On India Beating Sri Lanka: श्रीलंकन संघाची स्थिती एका क्षणाला 3 धावांवर 4 गडी बाद अशी होती. विशेष म्हणजे यापैकीही 2 धावा या वाईडच्या होत्या. आनंद महिंद्रांनी या सामन्यानंतर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Anand Mahindra On India Beating Sri Lanka: वर्ल्ड कप 2023 च्या 33 व्या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवला. आधी भारतीय फलंदाजींनी श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली. विराट कोहील, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरची शतकं हुकली तरी भारताने श्रीलंकेसमोर 357 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर गोलंदाजीमध्ये मोहम्मद शामी, मोम्मद सिराज, जसप्रीत बुमराहच्या भन्नाट गोलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेला केवळ 55 धावांवर बाद केलं आणि सामना 302 धावांनी भारताने हा सामना जिंकला. या पराभवासहीत श्रीलंकन संघ सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडला आहे. तर सेमीफायनलसाठी पात्र ठरणारा भारत पाहिला संघ ठरला आहे. भारताने वर्ल्ड कप 2023 मधील आपले 7 ही सामने जिंकले आहेत. सातव्या सामन्यातील भारतीय गोलंदाजीचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. अनेक आजी-माजी खेळाडूंसहीत नामवंत व्यक्तींनी भारतीय गौलंदाजांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. असं असतानाच सोशल मीडियावर फार सक्रीय असणारे उद्योजक आनंद महिंद्रांनीही थेट मानवतेबद्दल भाष्य करताना एक रंजक प्रतिक्रिया नोंदवली आहे.
सामन्यात भारताचाच दबदबा
भारतीय सलामीवीर शुभमन गिलने 92 बॉलमध्ये 92 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. विराट कोहलीचं 49 वं शतक केवळ 12 धावांनी हुकलं. कोहलीने 94 बॉलमध्ये 88 धावा केल्या. त्याने 11 चौकार लगावला. विराट आणि शुभमनने 189 धावांची खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यरने 56 बॉलमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. रविंद्र जडेजानेही 24 बॉलमध्ये 35 धावा करत डावाच्या शेवटी धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. नंतर भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय संघाने 55 धावांवर श्रीलंकन संघाला बाद केलं अन् या विजयासहीत सेमीफायनल्समधील आपलं स्थान निश्चित केलं. शमीने 5 विकेट्स घेतल्या. बुमराहने 1 विकेट घेतली, सिराजने 3 विकेट्स घेतल्या तर रविंद्र जडेजालाही एक विकेट मिळाली.
नक्की वाचा >> भन्नाट कामगिरीचं श्रेय शमीने कोणाला दिलं पाहिलं का? साधेपणाचं होतंय कौतुक
थेट युद्धाच्या कराराची आनंद महिंद्रांना झाली आठवण
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यामध्येही भारताने श्रीलंकन संघाला अवघ्या 50 धावांवर बाद केलं होतं. त्यानंतर भारतीय संघाने 6.1 ओव्हरमध्ये 51 धावांचं लक्ष्य गाठत सामना 10 विकेट्सने जिंकला होता. 17 सप्टेंबर 2023 च्या या सामन्याची आठवण भारतीय गोलंदाजांनी पुन्हा गुरुवारी वानखेडेच्या मैदानावर करुन दिली. श्रीलंकन संघाची स्थिती एका क्षणाला 3 वर 4 गडी बाद अशी होती. श्रीलंकन संघाची फलंदाजी पाहून सामना सुरु असतानाच आनंद महिंद्रांनी युद्धबंदीसंदर्भातील जागतिक शांतता कराराचा संदर्भ देत एक रंजक प्रतिक्रिया 'एक्स'वरुन (ट्वीटरवरुन) नोंदवली. "युद्धाच्या वेळेस मानवी मुल्यांचं पालन केलं जावं यासाठी काम करणाऱ्या जेनेव्हा करारासंदर्भातील तरतुदींवर देखरेख करणाऱ्या निरिक्षकांना विनंती करतो की याकडे लक्ष द्यावं. ही क्रूरता आहे," असं आनंद महिंद्रांनी 3 धावांवर श्रीलंकेची चौथी विकेट गेल्यानंतर ट्वीट केलं होतं.
नक्की वाचा >> 'मी स्वत:च्या...'; भारताकडून 302 धावांनी लाजीरवणा पराभव झाल्यानंतर श्रीलंकन कॅप्टनची कमेंट
श्रीलंकन संघासाठी बरं वाटलं असं आनंद महिंद्रा का म्हणाले?
भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकन संघाला 55 धावांवर बाद करत सामना 302 धावांनी जिंकल्यानंतर आनंद महिंद्रांनी श्रीलंकन संघासाठी बरं वाटल्याची प्रतिक्रिया नोंदवली. "वेस्ट इंडिजच्या सर्वोत्तम दिवसांमध्येही जेव्हा त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज होते तेव्हाही त्यांनी अशाप्रकारे एकाच संघाविरुद्ध दुसऱ्यांचा विकेट्सचा पाऊस पाडला नव्हता. याला म्हणतात दहशत. मॅच संपल्यानंतर मला श्रीलंकन संघाचा त्रास संपला याचं समाधान वाटलं," असं दुसरं ट्वीट आनंद महिंद्रांनी भारताच्या विजयानंतर केलं आहे. श्रीलंकन संघाची अवस्था पाहून आपल्याला दया येत होती. एकदाचे ऑल आऊट होऊन त्यांचा सामन्यामध्ये सुरु असलेला अपमान संपला असं आनंद महिंद्रांना सूचित करायचं आहे.
शामीने मोडला विक्रम...
मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेत वर्ल्ड कपमध्ये 44 विकेट्स घेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज होण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. शमीने जवागल श्रीनाथ आणि जाहीर खानचा विक्रम मोडीत काढला.