वर्ल्डकप स्पर्धेंचं बिगूल वाजलेलं असून, आता अवघ्या काही दिवसांवर स्पर्धा ठेपली आहे. यावर्षी भारतात संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धा पार पडणार असल्याने यजमान भारतीय संघ पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी करेल असे अंदाज व्यक्त होत आहेत. सध्या भारतीय संघ प्रचंड फॉर्मात असून, 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरोधात पहिला सामना होणार आहे. भारतीय फलंदाजांसह गोलंदाजही सध्या लयीत असल्याने ऑस्ट्रेलियासमोर कडवं आव्हान आहे. त्यादृष्टीने ऑस्ट्रेलिया संघ सध्या तयारी करत आहे. यावेळी सर्वात मोठं आव्हान फिरकी गोलंदाजांचं असणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाने रणनीती आखलेली दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षर पटेल दुखापतीमधून सावरला नसल्याने आर अश्विनला संघात स्थान देण्यात आलं आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढलेली दिसत आहे. कारण मागील तीन सामन्यांच्या मालिकेत आर अश्विनने ऑस्ट्रेलियाची चांगलीच फिरकी घेतली होती. ऑस्ट्रेलियाने आर अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी आखलेली रणनीती मात्र अपयशी ठरली आहे. कारण आर अश्विनचा डुप्लिकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेश पिथियाने त्यांना मदत करण्यास नकार दिला आहे. 


बडोदामधील ऑफ स्पिनर महेश पिथिया याच्या गोलंदाजीची स्टाइल ही तंतोतंत आर अश्विनसारखी आहे. याआधी त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान ऑस्ट्रेलिया संघासह काम केलं आहे. त्यामुळे आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाने आर अश्विनचा सामना करण्यासाठी महेश पिथियाला बोलावलं होतं. पण ऑस्ट्रेलियाला यश मिळालं नाही. कारण महेश पिथियाने नकार दिला आहे. 


5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरोधातील सामन्याची तयारी करण्यासाठी मगेश पिथियाला सरावात सहभागी होण्यासाठी बोलावलं होतं. पण बडोदाचे गोलंदाज प्रशिक्षक अरविंद यांच्याशी संवाद साधल्यानंतर 21 वर्ष महेश पिथियाने ऑस्ट्रेलियाची ऑफर नाकारली आहे. इतर गोष्टींच्या तुलनेत आपल्याला सध्या डोमेस्टिक क्रिकेटवर लक्ष द्यायचं आहे असं त्याने सांगितलं आहे. 


"ही एक रंजक ऑफर होती. पण मी डोमेस्टिक क्रिकेट खेळत असून बडोदा संघाचा भाग आहे. पुढील महिन्यापासून हे सामने सुरु होत आहेत. त्यामुळे मी आमच्या प्रशिक्षकांशी चर्चा केली आणि सध्या कॅम्पमध्ये येणं शक्य नसल्याचं ऑस्ट्रेलियाला कळवलं," असं महेश पिथियाने स्पोर्ट्सस्टारला सांगितलं.


महेश पिथियाने यावेळी स्पष्ट केलं की, आपण याआधी ऑस्ट्रेलियाच्या यादीत नव्हतो. पण बीसीसीआयने वर्ल्डकप संघात आऱ अश्विनच्या नावाची घोषणा करताच आपल्याला 4 ऑक्टोबरला चेन्नईत येण्याची ऑफर देण्यात आली. 


"बीसीसीआयने अक्षर पटेलच्या जागी आर अश्विनच्या नावाची घोषणा करताच मला फोन आला. आंतरराष्ट्रीय संघांसह काम करणं हे नक्कीच रंजक असतं. पण डोमेस्टिक क्रिकेट माझी प्राथमिकता आहे. बडोदासाठी खेळत असल्यानेच मी इथवर पोहोचलो आहे. मी ऑस्ट्रेलियन संघासह खेळण्यापेक्षा माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करावं असं वाटतं," असं महेश पिथिया म्हणाला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा नेदरलँडविरोधातील पहिला सराव सामना पावसामुळे रद्द झाला.