एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये कोणताही संघ मोठा नाही आणि जेव्हा फक्त यशस्वी संघांभोवती चर्चा फिरत राहते तेव्हाच एखाद्या पराभवामुळे धक्का बसतो असं भारताचा स्टार गोलंदाज विराट कोहलीने म्हटलं आहे. वर्ल्डकपमधील दोन सामन्यांच्या निकालाने क्रिकेटचाहत्यांना धक्का दिला आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने गतविजेता इंग्लंड तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 धावांनी तर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीने हे विधान केलं आहे. आज भारतीय संध बांगलादेशशी भिडणार आहे. तुलनेने दुबळा बांगलादेश संघ भारतीय संघाचा पराभव करेल का? अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"वर्ल्डकपध्ये कोणताही संघ मोठा नाही. जेव्हा कधी तुम्ही मोठ्या संघांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात करता, तेव्हा धक्का बसतो," असं विराट कोहलीने बांगलादेशविरोधातील सामन्याआधी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं. वर्ल्डकपमध्ये भारताने नेहमीच बांगलादेश संघाचा पराभव केला आहे. 2007 मध्ये त्यांच्या हातून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने त्यांना पुन्हा जिंकण्याची संधी दिलेली नाही. पण विराट कोहलीने बांगलादेश संघाला हलक्यात घेणं महागात पडू शकतं असं सांगत, शाकिब अल हसनचं उदाहरण दिलं आहे. 


"मी मागील अनेक वर्षं शाकिब अलीविरोधात खेळलो आहे. त्याच्याकडे फार नियंत्रण आहे. तो फार अनुभवी खेळाडू आहे. तो नव्या चेंडूसह फार चांगली गोलंदाजी करतो. त्याला फलंदाजाला आपल्या जाळ्यात असं अडकवायचं हे चांगलं माहिती आहे. तसंच तो फार धावाही देत नाही," असं विराट कोहलीने म्हटलं आहे. 


"अशा गोलंदाजांविरोधात तुम्हाला तुमची सर्वोत्तम खेळी करावी लागते. जर तुम्ही चांगली खेळी करु शकला नाहीत तर हे गोलंदाज दबाव निर्माण करण्यात यशस्वी होतील आणि तुम्ही बाद होण्याची शक्यता वाढते," असं विराटने सांगितलं.


भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानेही विराट कोहलीच्या मताशी सहमती दर्शवली आहे. "तो फार हुशाऱ खेळाडू आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेश संघाचं ओझं आपल्या खांद्यावर पेलवत आहेत," अशा शब्दातं हार्दिक पांड्याने कौतुक केलं.


दुसरीकडे बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसनने विराट कोहली हा सध्याच्या युगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचं म्हटलं आहे. विराट कोहलीसोबतच्या आपल्या मैदानावरील स्पर्धेवर बोलताना शाकीब अल-हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये मी त्याला आऊट करु शकलो याचा आनंद असल्याचं म्हटलं आहे. शाकीब अल-हसनने 23 सामन्यांमध्ये 6 वेळा विराट कोहलीची विकेट काढली आहे. एकदिवसीय प्रकारात 14 सामन्यांमध्ये त्याने 5 वेळा विराटला तंबूत धाडलं आहे. 


"तो एक विशेष फलंदाज आहे. मॉडर्न युगातील कदाचित सर्वोत्तम फलंदाज. मी त्याला 5 वेळा आऊट करु शकलो हे माझं भाग्य आहे. त्याची विकेट मिळवण्याचा आनंद वेगळाच असतो," असं शाकीब अल-हसनने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं.