World Cup 2023 Mujeeb Ur Rahman Emotional Post: अफगाणिस्तानच्या संघातील फिरकीपटू मुजीब उर रेहमानने सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. नवी दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियममधील सामन्यानंतर मुजीब उर रेहमानला मिठी मारणाऱ्या छोट्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत विजय मिळवला. या विजयानंतरच या मुलाने अफगाणिस्तानच्या विजयामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या मुजीब उर रेहमानला रडत रडत मिठी मारली. अनेकांना हा मुलगा अफगाणी असल्याचं वाटलं. मात्र यामागील सत्य समोर आलं असून मुजीब उर रेहमाननेच याबद्दल खुलासा केला आहे.


तो अफगाणी मुलगा नव्हता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुजीब उर रेहमानने त्याला मिठी मारणारा हा मुलगा मूळचा दिल्लीचा आहे. या तरुण चाहत्याला भेटल्यानंतरच्या भावना मुजीब उर रेहमानने सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या आहेत. तसेच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आम्हाला मिळालेला पाठिंबा हा फारच भारावून टाकणारा होता असंही मुजीब उर रेहमानने या मुलाने मिठी मारल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.


मुजीब उर रेहमान काय म्हणाला?


या मुलाने मिठी मारल्याचा फोटो पोस्ट करताना मुजीब उर रेहमानने आपल्या भावना व्यक्त केल्यात. "तो अफगाणी मुलगा नव्हता. तो भारतीय मुलगा होता. नवी दिल्लीमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यातील आमचा पराभव पाहून त्याला एवढा आनंद झाल्याचं पाहिल्यानंतर मी भारावून गेलो. क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर त्या भावना आहेत. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानतो. आमच्यासाठी दाखवलेलं प्रेम आणि दिलेल्या पाठिंब्याने आम्ही भारावून गेलो आहोत," असं मुजीब उर रेहमान म्हणाला आहे.


"तुम्ही सातत्याने देत असलेल्या पाठिंब्यासाठी आम्ही फार ऋणी आहोत. भविष्यात तुमचा पाठिंबा मिळत राहावा अशी आमची अपेक्षा आहे. दिलेल्या पाठिंब्यासाठी दिल्लीचे पुन्हा एकदा आभार," असं पोस्टच्या शेवटी मुजीब उर रेहमानने म्हटलं आहे.



ऐतिहासिक कामगिरी


रविवारी झालेल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला 69 धावांनी पराभूत केलं. 285 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 215 धावांवर बाद झाला. रेहमानुल्ला गुरबाझने 80 धावांची दमदार खेळी केल्याने अफगाणिस्तानला 280 हून अधिक धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून केवळ हॅरी ब्रूकनेच 66 धावांची झुंजार खेळी केली. मुजीब उर रेहमान आणि राशीद खानने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. 


2015 साली मिळवलेला शेवटचा विजय


"मागील पर्वातील विजेत्यांना पराभूत करणं हे फारच खास आणि अभिमानास्पद आहे. संपूर्ण देशासाठी आणि संघासाठी ही फार आनंदाची बातमी आहे. आमच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली," असं मुजीब उर रेहमान म्हणाला. अफगाणिस्तानने तब्बल 14 सामन्यानंतर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला आहे. 2015 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडविरुद्धचा सामना अफगाणिस्ताने जिंकला होता.