World Cup 2023: एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केल्यानंतर एकच चर्चा रंगली आहे. हा पराभव इतका मानहानीकारक होता की, याच्या जखमा पुढील अनेक महिने ताज्या राहणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने 7 गडी राखत पाकिस्तानला धूळ चारली. दरम्यान, पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत तीनपैकी फक्त एकच सामना गमावला असला तरी क्रिकेटचाहते त्यांच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तसंच जर पाकिस्तानला भारताचा पराभव करत बदला घेण्याची इच्छा असेल तर त्यांना सेमी-फायनल गाठावी लागणार आहे. यादरम्यान, पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीने बांगलादेश संघ आमच्या पराभवाचा वचपा काढतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेहर शिनवरी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. सेहरने एक्सवर पोस्ट शेअर केली असून, जर बांगलादेशने भारतीय संघाचा पराभव केला तर आपण बांगलादेशी क्रिकेटरसह डेटला जाऊ असं आश्वासन दिलं आहे. गुरुवारी भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहे. पुण्यात हा सामना होणार आहे. 


"इंशाअल्लाह, माझे बंगाली बंधू पुढील सामन्यात बदला घेतील. जर बांगलादेशने भारताचा पराभव केला तर मी ढाकाला जाईन आणि बंगाली मुलासह फिश डिनर डेटला जाईन," असं सेहरने एक्सवर म्हटलं आहे. 



सेहरने याआधीही दिली आहेत अशी आश्वासनं


सेहरने बांगलादेशला असं आश्वासन देण्याची ही काही पहिली वेळ नाही. टी20 वर्ल्डकपदरम्यान तिने जर झिम्बॉब्वे संघाने भारताचा पराभव केला तर मी त्यांच्या देशातील तरुणाशी लग्न करेन असं जाहीर केलं होतं. तसंच तिने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याने नेटकरी तिला ट्रोल करत असतात. तू गेल्यावेळी म्हणाली होतीस ट्विटर सोडेन, चल खोटारडी असं सांगत तिला ट्रोल केलं जात असतं. 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार


दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेत आयसीसीकडे तक्रार केली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याची माहिती दिली आहे. 


"पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यात विलंब, तसंच सध्याच्या विश्वचषक 2023 साठी पाकिस्तानी चाहत्यांकरिता व्हिसा धोरण नसल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीकडे आणखी एक औपचारिक निषेध नोंदवला आहे. पीसीबीने अनुचित वर्तनाबद्दल तक्रार देखील दाखल केली आहे. 14 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाला लक्ष्य करण्यात आले,” असं ट्वीट पीसीबीने केलं आहे. 


वर्ल्डकपमधील सामन्यांबद्दल बोलायचं गेल्यास, बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ आता ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत तीनपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. तर पाकिस्तान संघ भारताविरोधातील पराभवानंतर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल.