World Cup Final 2023 Ticket : भारतामध्ये क्रिकेटला धर्म म्हणून पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक क्रिकेट फॅन टिम इंडिया-ऑस्ट्रेलियातील मॅचचा साक्षीदार होण्यास सज्ज आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून हा सामना पाहता येणार आहे. साधारण 1 लाख 30 हजार इतकी या स्टेडीयमची प्रेक्षक क्षमता आहे. यामध्ये राहुल द्रविडचा खास पाहुणा देखील टिम इंडियाला चिअर्स करणार आहे. खुद्द 'द वॉल' राहुल द्रविडनेच त्याला तिकिट दिले आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या जबरा फॅन्सच्या कहाण्या आपण ऐकल्या असतील. त्यात आता राहुल द्रविडच्या फॅन्सची अनोखी कहाणी समोर येत आहे.


कोलकात्यातील छोले-भटुरे विक्रेता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल द्रविड हा नेहमीच आपल्या संवेदनशीलतेसाठी ओळखला जातो. टिम इंडियाचा माजी कॅप्टन ते सध्याचा प्रशिक्षक असा प्रवास करतानाही त्याचे पाय आजही जमिनीवरच असल्याचे आपल्याला वारंवार दिसून आले आहे. असाच एक प्रसंग समोर आलाय. वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मनोजमध्ये असे काय खास आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर विशेष म्हणजे मनोजला सामना पाहण्यासाठीचे तिकीट भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले आहे. मनोज हा राहुल द्रविडचा कट्टर चाहता आहे. आपल्या फॅनच्या प्रेमाप्रती राहुल द्रविडने त्याला खास गिफ्ट दिले आहे. 


1997 पासून मनोज राहुल द्रविडला फॉलो करतोय


मनोज जयस्वाल हा कोलकाताचे रहिवासी असून तो शहरात छोले-भटुरे विकण्याचा छोटा व्यवसाय करतो. मनोज हा 1997 पासून राहुल द्रविडला फॉलो करत आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्याने द्रविडशी संबंधित हजारो फोटो, बातम्यांचे कटिंग्ज, इतर क्रीडा लेख संग्रहित केले आहेत. मनोजकडे द्रविडचे फोटो आणि बातम्यांच्या कटिंग्जने भरलेल्या सुमारे 6 ट्रंक आहेत. राहुल द्रविडसोबत त्याची पहिली भेट 2001 मध्ये कोलकाता येथे झाली होती. यानंतर आपण हळूहळू राहुल द्रविडचा सर्वात जवळचा चाहता बनल्याचे मनोज सांगतो.


दोन्ही संघांकडून चमकदार कामगिरी 


वर्ल्ड कप 2023 मध्ये यजमान भारताने 10 पैकी 10 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. जिथे विराट कोहलीने 50 वे एकदिवसीय शतक झळकावले आणि मोहम्मद शमीने विक्रमी सात विकेट घेतल्या. दुसरीकडेऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये शेवटचा जिंकलेला सहाव्या वनडे विश्वचषक विजेतेपदावर लक्ष ठेवले आहे. त्यांनी त्यांच्या 2023 च्या मोहिमेची सुरुवात भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवाने झाली. पण लवकरच त्यांनी शानदार पुनरागमन केले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने उर्वरित सात गट सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.


वर्ल्ड कप 2023 हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. असे असले तरी याचा समारंभ सोहळा दुपारी 12:30 वाजल्यापासून पाहता येणार आहे. क्रिकेटप्रेमींना डिजिटल स्क्रीनवर हा सोहळा पाहता येईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक फायनलचे विनामूल्य थेट प्रवाह Disney+Hotstar ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे . डिस्नीचे प्रीमियम वापरकर्ते वेबसाइट आणि अ‍ॅप दोन्हीवर HD स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे विश्वचषक 2023 चे प्रसारण हक्क आहेत आणि फायनल स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी हिंदी, स्टार गोल्ड SD, SS1 तमिळ SD+HD, SS1 तेलुगु SD+HD, स्टार माँ गोल, SS1 वर प्रसारित केली जाणार आहे.   क्रिकेट चाहत्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरुन या मॅचचा आनंद लुटता येणार आहे.