एकदिवसीय वर्ल्डकपमधील सर्वाधिक उत्कंठावर्धक सामन्यासाठी आता अवघे काही क्षण उरले आहेत. क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भारत-पाकिस्तान संघ शनिवारी अहमदाबादच्या मैदानावर भिडणार आहेत. इतर स्पर्धांच्या तुलनेत वर्ल्डकपमध्ये जेव्हा दोन्ही संघांमध्ये सामना होणार असतो, तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष असतं. सध्या दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून आपापले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. या सामन्याआधी दोन्ही देशातील क्रिकेट दिग्गज आपलं मत मांडत भाकीत वर्तवत आहेत. यादरम्यान पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू आणि माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने मोठं विधान केलं आहे. हा सामना नाजूक मनाच्या लोकांसाठी नाही असंही त्याने जाहीर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"जर तुम्ही शूर असाल आणि हिंमत असेल तर सामन्याची आनंद लुटू शकता. पण जर तुम्हा भ्याड असाल तर नाजूक मनाच्या लोकांसाठी हा सामना नाही. ही स्पर्धा त्यांच्यासाठी आहे ज्यांना आपलं नाव मोठं करण्याची इच्छा आहे. ज्यांना सुपरस्टार होण्याची इच्छा आहे," असं शोएब अख्तरने RevSportz सह चॅट करताना सांगितलं. 


शोएब अख्तरने यावेळी भारतीय संघाच्या तुलनेत पाकिस्तान संघावर जास्त दबाव नसेल असं सांगताना त्यामागील कारणाचाही उलगडा केला. शोएब अख्तरने आपल्या अनुभवांचा उलगडा करताना भारतीय संघाला नेहमीच दावेदार मानलं जात असल्याचा पाकिस्तानला फायदा होतो असं सांगितलं. 


"मागील वर्षी मी दुबईत असताना एका चॅनेलसाठी कार्यक्रम करत होते. त्यावेळी त्यांनी सगळं निळ्या रंगात रंगवलं होतं आणि फक्त एकाच गोष्टीवर बोलत होते ते म्हणजे भारतीय संघ पाकिस्तानला चिरडणार आहे. कोण हा दबाव तयार करतं? जेव्हा तुम्ही आम्हाला कमी लेखता तेव्हा सहजपणे आमच्यावरील दबाव निघून जातो," असं शोएब अख्तरने सांगितलं.


"आम्ही आता काय करणार आहोत? आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. पाकिस्तान आता भारताला सर्वाधिक टीआरपी मिळवण्यात मदत करणार आहे. कारण भारतातील वर्ल्डकप स्पर्धा सर्वात मोठी व्हावी अशी आमची इच्छा आहे. हा सर्वात छान वर्ल्डकप झाला पाहिजे," असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.


शोएब अख्तरने यावेळी बाबर आझमच्या नेतृत्वातील संघ विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. "मला वाटतं पाकिस्तान संघाला भारताचा पराभव करणं फार सोपं जाणार आहे. कारण हा तुमचा टीव्ही आहे, तुमची स्पॉन्सरशिप आहे, तुम्ही तिथे अडकले आहात, आम्ही नाही. बाबर आझमच्या संघाने आक्रमकपणे आणि नीट खेळलं पाहिजे. तुम्ही भारताचा पराभव करा आणि अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळा. मी तुमच्यासोबत आहे," असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.