पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधला खेळ खल्लास? गांगुलीचं सूचक विधान; म्हणाला, `आमच्या वेळी पाकिस्तानी...`
Sourav Ganguly About Pakistan Side: पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील आपल्या 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेत मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना स्पर्धेत पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे.
Sourav Ganguly About Pakistan Side: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा संघ कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली नावाला साजेशी कामगिरी करताना दिसत नसल्याची खंत पाकिस्तानी चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. अव्वल 4 संघांमध्ये पाकिस्तानी संघाचा समावेश असला तरी भारताविरुद्धचा सामना बाबरच्या संघाने 7 विकेट्सने गमावल्यापासून त्यांच्यावर सातत्याने टीका होत असल्याचं दिसत आहे. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात अभूतपूर्व पडझडीनंतर पाकिस्तानचा डाव 191 वर आटोपल्यावर भारताने सहज हे लक्ष्य गाठलं. या पराभवामुळे अजेय पाकिस्तनला वर्ल्ड कप 2023 मध्ये पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागल्याने पाकिस्तानचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचं म्हटलं जात आहे.
गांगुलीचं सूचक विधान
भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये सर्वच बाबतीत सरस कामगिरी केली आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजीचं नेतृत्व जसप्रीत बुमराहने केलं. भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकं झळकावत भारताला मोठा विजय मिळवून दिला. या विजयासंदर्भात नुकतेच भाष्य करताना भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने सूचक विधान केलं आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाला पुनरागमन करणं कठीण जाईल असं गांगुलीने म्हटलं आहे. म्हणजेच पाकिस्तानचा संघ सेमी फायनल्सआधीच स्पर्धेमधून बाहेर पडेल असं गांगुलीला सूचित करायचं आहे.
आमच्या वेळेस असा संघ नव्हता
सौरव गांगुलीने बाबरच्या नेतृत्वाखालील संघाच्या फलंदाजीवर कठोर भाष्य करताना पाकिस्तानी फलंदाजीची इज्जतच काढल्याचं दिसून आलं. "आमच्या वेळी पाकिस्तानी संघ अगदी वेगळा होता. अशाप्रकारच्या पाकिस्तानी संघाविरुद्ध आम्ही खेळलेलो नाही. फलंदाजी करताना या (पाकिस्तानी) संघाला तणाव झेलता येत नाही," असं सौरव गांगुलीने टाइम्स नाऊशी बोलताना म्हटलं आहे. "पाकिस्तानला आता अशा फलंदाजीसहीत वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करणं कठीण होईल," असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
भारत सर्वात क्षेत्रात उत्तम असल्याचा दादाचा शेरा
सौरव गांगुलीने भारतीय संघावर स्तुती सुमनं उधळली आहेत. "रोहितने पाकिस्तानविरुद्ध उत्तम खेळ केला. भारत प्रत्येक गोष्ट (फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण) उत्तमप्रकारे करत आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सारं काही एकाच वेळी छान जुळून आलं आहे," असं सौरव गांगुलीने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाबद्दल प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे.
भारत पाकिस्तान सामन्यानंतर वाद
भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तानने गरज नसताना वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक मिकी ऑर्थर यांनी भारत आणि पाकिस्तानचा सामना हा 'बीसीसीआयचा कार्यक्रम' वाटत होता असं विधान करुन नवीन वादाला तोंड फोडलं आहे. पाकिस्तानने मोहम्मद रिझवान बाद होऊन पव्हेलियनमध्ये परत जात असताना धार्मिक शेरेबाजी झाल्याची तक्रारही आयसीसीकडे केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीविरोधात कोड ऑफ कंडक्टअंतर्गत कारवाई केली जाते मात्र मोठ्या गटाने लोक घोषणाबाजी करत असतील तर त्यावर कारवाई कशी करणार अशापद्धतीची भूमिका घेतली आहे.