New Zealand beats Pakistan​: केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने वर्ल्डकपच्या सराव सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडच्या संघाने हैदाराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पार पडलेल्या सराव सामन्यात पराभूत केलं आहे. पाकिस्तानच्या सो कॉल्ड जगात भारी गोलंदाजांची लाज काढत न्यूझीलंडने हा 44 व्या ओव्हरमध्येच जिंकला. न्यूझीलंडने सामना 5 गडी राखून जिंकला. न्यूझीलंडच्या 4 फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. विशेष म्हणजे जगातील सर्वोत्तम गोलंदाजी करणारा संघ अशी ओळख असलेल्या पाकिस्तानच्या गोलंदाजांना 345 धावांचं लक्ष्याचा बचावही करता आला नाही. न्यूझीलंडने 38 चेंडू शिल्लक असतानाच स्कोअरबोर्डवर 346 धावा झळकावत सामना जिंकला. या विजयामुळे पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद रिझवानचं शतक व्यर्थ गेलं. कर्णधार बाबर आझमने झळकावलेलं अर्धशतकही वाया गेलं.


न्यूझीलंडने 8 गोलंदाजांचा वापर केला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकडून विकेटकीपर बॅट्समन असलेल्या मोहम्मद रिझवानने रिटायर्ड हर्ट होण्याआधी 103 धावा केल्या. त्याने 94 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. बाबर आझमने 80 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. सौद शकीलने 75 धावा केल्या. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या मोबदल्यात 345 धावा केल्या. पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मदुल्ला शकिफ आणि इमाम उल हक झटपट बाद झाले. 46 धावा फलकावर असतानाच पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने 100 हून अधिक धावांची पार्टनरशीप करत पाकिस्तानचा डाव सावरला. मॅट हेन्री आणि मिचेल सॅण्टनर वगळता न्यूझीलंडच्या सर्व गोलंदाजांना पाकिस्तानच्या फलंदाजांनी 6 हून अधिकच्या सरासरीने कुटलं. न्यूझीलंडने तब्बल 8 गोलंदाजांचा वापर केला हे विशेष.


नक्की वाचा >> 'पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात श्रेयस अय्यर होता अंपायर!' फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का


पाकिस्तानची सुमार गोलंदाजी अन् न्यूझीलंडचा विजय


कर्णधार केन विलियमन्सन जवळपास 6 महिन्यानंतर मैदानात उतरला. मात्र त्याचा खेळ पाहून तो मैदानापासून आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता असं वाटलं नाही. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनव्हेने पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र रचीन रविंद्रने भन्नाट फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना झुंजवलं. रचिन रवींद्रने न्यूझीलंडला उत्तम फलंदाजी करताना 72 चेंडूंमध्ये 97 धावा केल्या. यामध्ये 16 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. विलियम्सनने 54 धावा केल्या. रिटायर्ड हर्ट होण्याआधी डॅरेल मिशेलने 59 धावा केल्या.


नक्की पाहा >> पाकिस्तानच्या 'वर्ल्ड क्लास' बॉलर्सला 'थर्ड क्लास' समजून कुटणाऱ्या खेळाडूचं सचिन-राहुलशी खास नातं


मार्क चॅपमॅनने 41 चेंडूंमध्ये नाबाद 65 धावा केल्या. यामुळे न्यूझीलंडने 43.4 ओव्हरमध्येच सामना जिंकला. न्यूझीलंडने यशस्वीपणे 345 धावांचा पाठलाग केल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल यात शंका नाही. दुसरीकडे पाकिस्तानची गोलंदाजीसंदर्भातील चिंता या सामन्यानंतर अधिक वाढली आहे.