`एक काम करा भारत विरुद्ध संपूर्ण जग...`, SA च्या दणदणीत पराभवानंतर वसीम अक्रमचं मोठं विधान, `सगळंच कसं...`
पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दणदणीत पराभव केल्यानंतर वसीम अक्रमने संपूर्ण जग विरुद्ध भारत खेळवलं पाहिजे असं म्हटलं आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव करत वर्ल्डकपमधील आपल्या सलग 8 व्या विजयाची नोंद केली आहे. कोलकात्यामधील ईडन गार्डन्स मैदानात झालेल्या या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 243 धावांनी पराभव केला आहे. यानंतर संपूर्ण जगभरातून भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं जात आहे. पाकिस्तान संघही यामध्ये मागे नाही. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने भारताचं तोंडभरुन कौतुक केलं असून, संपूर्ण जगात सध्या भारताला स्पर्धा देणारा संघ नाही असं म्हटलं आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर वसीम अक्रमने A Sports शी संवाद साधताना म्हटलं की, भारत विरुद्ध संपूर्ण जग अशी स्पर्धा खेळवणं सध्या जास्त योग्य ठरेल. भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात पूर्णपणे वर्चस्व राखल्याचं सांगायलाही तो विसरला नाही. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा फक्त 83 धावांत धुव्वा उडवला आणि गुणतालिकेत पहिला क्रमांक कायम ठेवला.
"संपूर्ण जग विरुद्ध भारत अशी स्पर्धा खेळवणं जास्त योग्य आहे. गोलंदाजी, फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण असो, तिन्ही विभागांत भारतीय संघाने वर्चस्व राखलं आहे. त्यांना प्रथम फंलदाजी केली काय किंवा गोलंदाजी केली काय...काही फरक पडत नाही. खेळातील सर्व गोष्टींवर त्यांनी नियंत्रण मिळवलं आहे. यापेक्षा जास्त त्यांच्या कामगिरीवर काय बोलणार," असं कौतुक वसीम अक्रमने केलं आहे.
वसीम अक्रमने यावेळी विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं. त्याला सध्याच्या काळातील महान खेळाडू का म्हणतात हे तो सिद्ध करत आहे असं वसीम अक्रमने म्हटलं. विराट कोहलीने आपल्या वाढदिवशी 49 वं शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं ठोकली आहे. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला आता फक्त एका शतकाची गरज आहे.
"आम्ही त्याला मॉडर्न क्रिकेटमधील महान फलंदाज का म्हणतो हे सिद्ध केल्याबद्दल विराट कोहलीचं अभिनंदन. तो या खेळातील सर्वोच्च स्थानी आहे. या धावपट्टीवर फलंदाजी करणं सोपं नव्हतं. रोहित शर्मा ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे त्यामुळे इतरांवरील दबाव कमी होतो. रोहित शर्मा अविश्वसनीय आहे. दुसरी विकेट पडली तोवर सामना भारताच्या बाजूने झुकला होता आणि दक्षिण आफ्रिका पाहत राहिली," असं वसीम अक्रमने सांगितलं.
रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने 8 सामने जिंकत 16 गुण मिळवले आहेत. आता भारतीय संघा लीगमधील एकच सामना शिल्लक आहे. 11 नोव्हेंबरला बंगळुरुत भारत नेदरलँडविरोधात भिडणार आहे.