`भारतीय म्हणून घ्यायची लाज वाटते, BCCI ने...`; गावसकर कॅमेंट्री बॉक्समधून खरंच असं म्हणाले?
Sunil Gavaskar Viral Quote On World Cup: मागील काही दिवसांपासून ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात एक नवीन खुलासा समोर आला आहे.
Sunil Gavaskar Viral Quote On World Cup: भारतामध्ये 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरु झाली आहे. क्रिकेटवेड्या देशामध्ये तब्बल 12 वर्षानंतर या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. मात्र या स्पर्धेतील पाहिल्याच सामन्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यानचा सामन्याकडे चाहत्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात मैदानातील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. मैदानांमध्ये पुरेश्या प्रमाणात प्रेक्षक नसल्याच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावरुन टीकेचे झोड उठलेली असतानाच भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आणि विद्यमान समालोचक सुनील गावसकर यांच्या नावाने सध्या एक विधान व्हायरल होत आहे. याच विधानासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सामन्यांकडे प्रेक्षकांची पाठ?
भारतामध्ये आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकप 2023 मधील पहिल्या 5 सामन्यांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सुनील गावसकर हे फार निराश झाले असून त्यांनी भारतीय असल्याची लाज वाटते अशा अर्थाचं विधान केल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहे. एक्स या सोशल मीडिया साईटवर म्हणजेच ट्वीटरवरील एएसजी नावाच्या खात्यावरुन गावसकर यांचा कॉमेंट्री बॉक्समधील फोटोसहीत त्यांनी भारतीय असल्याची लाज वाटत असल्याचं विधान केल्याचा दावा केला आहे.
काय दावा करण्यात आलाय?
"सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना, मला भारतीय म्हणून घ्यायला लाज वाटतेय. हा आतापर्यंतचा सर्वात वाईट वर्ल्डकप आहे. रिकामी मैदानं, स्कोअरबोर्ड न दिसणे, बीसीसीआयने वाईट पद्धतीने नियोजन केलं आहे, असं म्हटलंय. गावसकर यांनी स्पष्टपणेच सांगितलं आहे," अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
या दाव्यामागील सत्य काय?
मात्र या पोस्टसंदर्भात सत्यता पडताळणी चाचणी म्हणजेच फॅक्ट चेक टेस्ट घेतल्यानंतर गावसकर हे या सामन्यामध्ये समालोचक म्हणून काम करत नव्हते. तसेच कोणत्याही प्रसारमाध्यमांनी अशाप्रकारचं वृत्त दिलेलं नाही. गावसकर हे समालोचक नव्हतेच म्हणून त्यांनी असं विधान केलेलं नाही हे स्पष्ट होतंय.
यापूर्वीही पसरवली आहे खोटी माहिती
विशेष म्हणजे ज्या एएसजी नावाच्या खात्यावरुन पोस्ट करण्यात आली आहे त्या खात्यावरुन यापूर्वीही खोटी माहिती पसरवण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैनच्या तोंडी त्याने न बोलेलं वाक्य संदर्भ देऊन या खात्यावरुन पोस्ट करण्यात आलेलं. मात्र नासीर हुसैननेही सोशल मीडियावरुनच हा दावा खोडून काढत या एएसजीचं तोंड बंद केलं होतं.
खोटी माहिती पसरवणाऱ्या खात्यांबद्दल धक्कादायक खुलासा
आश्चर्याची बाब म्हणजे गावसकर असं बोलले नाही हे एकाने लक्षात आणून दिल्यानंतरही या एएसजीने आपला दावा खरा करण्यासाठी आणखीन खोटं विधान केलं. गावसकर हे कॉमेंट्री करत नव्हते तरी सामन्यानंतर त्यांनी हे विधान केल्याचा दावा एएसजीने केला. काही जणांनी या दाव्याचं समर्थन केलं. विशेष म्हणजे या दाव्याला समर्थन करणारी अनेक खाती ही पाकिस्तान आणि दुबईमधील असल्याचं 'इंडिया टुडे'च्या फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झालं आहे.
पाकिस्तानमधून पूर्वीही झालेत प्रयत्न
यापूर्वीही पाकिस्तानमधील काही खात्यांवरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटचा संदर्भ देत वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न झाल्याची उहारणं आहेत. आता भारतात होत असलेल्या या स्पर्धेमध्ये उगाच वाद निर्माण करायचा उद्योग पाकिस्तानमधील खोडसाळ लोक करत आहेत.