साऊथम्पटन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं सगळ्यात मोठं मार्केट म्हणून भारताचं नाव घेतलं जातं. पण हे मार्केट बनायला सुरुवात झाली ती १९८३ साली. २५ जून १९८३ साली भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला आणि जगाला एक नवा चॅम्पियन गवसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८३ वर्ल्ड कपमध्ये सुवर्णाक्षकांनी कोरून ठेवावा असा क्षण भारतीयांनी अनुभवला. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमने इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेटमधील एका क्रांती पर्वाला सुरुवात झाली. १९८३मध्ये भारतानं प्रथमच वर्ल्ड कपला गवसणी घाताली आणि साऱ्या देशवासियांच्या माना अभिमानानं उंचावल्या.


हा वर्ल्ड कप भारत जिंकेल असं कोणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं. त्यावेळी क्रिकेटवर राज्य करतं होतं वेस्ट इंडिज. याच बलाढ्य वेस्ट इंडिज टीमविरुद्ध अंतिम सामना रंगला होता. यामुळे विंडिजच पुन्हा वर्ल्ड कप जिंकणार असा दावा मोठमोठे दिग्गज करत होते. मात्र कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेटपटूंनी साऱ्या क्रिकेट पंडितांना खोट ठरवत वर्ल्ड कपवर नाव कोरलं.


या वर्ल्ड कपमध्ये आठ टीम सहभागी झाल्या होत्या. भारतीय टीमचा समावेश वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड असलेल्या बी गटात होता. म्हणजे भारतासाठी सुरुवातीपासूनच बिकट वाट होती. प्रत्येक टीम एकमेकांशी दोनदा सामने खेळणार होते.


या वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिल्यांदाच मुकाबला धोकादायक विंडिजशी होता. विशेष म्हणजे भारतीय टीमने आपल्या पहिल्याच लढतीत दोन वेळेच्या वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिजला ३४ रन्सनं धुळ चारत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर झिम्बाब्वेलाही ५ गडी राखत मात दिली.


दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून भारताला १६२ रन्सनं पराभव स्वीकारावा लागला. यानंतर मात्र विंडिजनं भारताला ६६ रन्सनं धुळ चारली. मग भारतानं कमबॅक करत झिम्बाब्वेला ३१ रन्सनी मात दिली. तर ऑस्ट्रेलियालाही ११८ धावांनी पराभूत करत बदला घेतला.


भारतानं ग्रुपमध्ये सहापैकी चार सामने जिंकत आपल्या ग्रुपमध्ये दुसरं स्थान पटकावत सेमी फायनलमध्ये धडक मारली. सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला होता यजमान इंग्लंडशी. भारतानं इथंही बाजी मारत इंग्लंडला ६ गडी राखत नामोहरम केलं. त्यानंतर फायनल रंगली ती विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या विंडिजशी. मात्र भारतानं विंडिजलाही ४३ रन्सनी पराभूत करत वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.


फायलनमध्ये खरतर भारतानं टॉस हरला होता आणि जगातील सर्वोत्तम आणि सर्वाधिक वेगवान माऱ्याचा मुकाबला करण्याचं आव्हान भारतीय बॅट्समनसमोर होतं. प्रथम बॅटिंगला उतरलेल्या भारताची सुरुवातही खराब झाली होती. भारताचे ओपनिंगचे भरवशाचे बॅट्समन सुनील गावसकर केवळ दोन रन्सवर आऊट झाले होते.


या मॅचमध्ये भारताकडून कुणीही सेंच्युरी किंवा हाफ सेंच्युरी झळकावली नाही हे विशेष. भारताकडून सर्वाधिक रन्स करणारे श्रीकांत ३८ रन्सवर आऊट झाले. यानंतर विंडिज बॉलर्सनं भारतीय बॅट्समन जखडून ठेवलं. त्यांना फारशा रन्सच करु दिल्या नाहीत. भारताकडून फायनलमध्ये केवळ तीन सिक्सर्स लगावले गेले. तरी भारतानं १८३ रन्सचा टप्पा गाठला. 


यानंतर भारतीय बॉलर्ससमोर विंडिजला १८३ रन्समध्येच गारद करण्याचं आव्हान होतं. तिथलं वातावरण आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेऊन भारतीय बॉलर्सना बॉलिंग करावी लागणार होती. समोर सर विवियन रिचर्ड्स, क्लाईव्ह लॉईडसारखे जगातील सर्वोत्तम बॅट्समन होते. मात्र भारतीय बॉलर्सनं कच खाल्ली नाही. विंडिज पाच रनवर असताना बलविंदरसिंग संधूनं भारताला पहिलं यश मिळवून दिलं.


हॅन्स आणि रिचर्ड्सनं ४५ रन्सची पार्टनरशिप करत विंडिजला ५०चा आकडा पार करुन दिला. दोघांचाही विकेटवर जम बसला असताना कपिल देव यांनी मदनलाल यांच्या बॉलिंगवर विवियन रिचर्ड्स यांचा निर्णायक आणि कठीण असा कॅच घेतला. हाच या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला.


कपिल देव यांनी जवळपास १८ ते २० यार्ड दूरवरुन हा कॅच घेतला होता. यानंतर मदनलाल, मोहिंदर अमरनाथ आणि संधू यांच्यासमोर विंडिजचे बॅट्समन ठराविक अंतरानं आऊट होत गेले आणि ५२ ओव्हर्समध्ये विंडिजला १४० रन्समध्ये ऑल आऊट करण्यात भारतीय बॉलर्सना यश आलं. आणि लॉर्ड्सवर एक इतिहास रचला गेला.


क्रिकेटमधील विंडिजची सद्दी संपुष्टात आणण्यात भारताला यश आलं. यानंतर भारतानं २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकला. कदाचित भविष्यातही भारत वर्ल्ड कप जिंकेल. मात्र १९८३ वर्ल्ड कप सुवर्णाक्षरांनीच कोरला जाईल. कारण भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती याच विजयी वर्ल्ड कपमुळे घडली होती.