एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान संघ समोर येणार असल्याचं ठरल्यापासून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल-हक यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. आयपीएलमध्ये दोन्ही खेळाडू आपापसात भिडल्याने मोठा वाद झाला होता. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. आयपीएलमधील वादांचा उल्लेख केला जातो, तेव्हा याचीही चर्चा होते. दरम्यान, गुरुवारी भारत आणि अफगाणिस्तान संघ आमने-सामने येणार असताना लखनऊ सुपरजायंट्सने या वादाची जखम पुन्हा ताजी  केली आहे. लखनऊने आंब्याचा उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 'आंबे कधी खाऊ नयेत?'. यावेळी त्यांनी आंब्यांचा फोटोही शेअर केला आहे. 



नवीन उल-हकने विराट कोहलीसह झालेल्या वादानंतर इंस्टाग्रामला अनेक फोटो शेअर केले होते. आयपीएलमध्ये जेव्हा कधी बंगळुरुचा पराभव होत असे तेव्हा नवीन उल-हक आंब्यासंबंधी पोस्ट करत असे. यानंतर जेव्हा लखनऊ संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता तेव्हा विराटच्या चाहत्यांनी आंब्यांवरुन त्याला ट्रोल केलं होतं. हा वाद इतका वाढला होता की, लखनऊ संघाला आंबा, आंबे, गोड, आम असे अनेक शब्द सोशल मीडियावर म्यूट करावे लागले होते. पण आता तेच आंबा शब्द घेऊन परतले आहेत. 


भारताविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला कोहली विरुद्ध नवीन लढतीबद्दल विचारण्यात आले. “हे पाहा, तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे जसे भारत आमचे घर आहे. आम्ही येथे खेळलो आहोत आणि भारतातील लोक अफगाणिस्तानच्या लोकांना खूप प्रेम देतात".


"आणि मैदानात जे घडले, ती आक्रमकता प्रत्येक खेळाडूत असते. हे भारत आणि अफगाणिस्तानबद्दल नाही. त्यामुळे, ते प्रत्येकासह होऊ शकतं. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारखे अनेक खेळाडू आमच्यासाठी आदर्श आहेत,” असं त्याने सांगितलं आहे.