Ravi Shastri On World Cup Semi Finals Ind vs NZ: भारतीय संघाचा वर्ल्ड कप 2023 मधील सेमीफायलनचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. हा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचा सेमीफायलनमधील रेकॉर्ड हा निराशाजनक राहिल्याने आणि 2019 च्या वर्ल्डकपमध्ये सेमीफायलनमधूनच ज्या संघाने भारताला घरचा रस्ता दाखवला त्याच संघाविरोधात सामना असल्याने चाहत्यांची धडधड वाढली आहे. अशी स्थिती असतानाच भारताचे माजी प्रशिक्षक आणि फलंदाज रवी शास्त्री यांनी भारताने यंदा वर्ल्ड कप जिंकला नाही तर त्यांना पुढील 3 वर्ल्ड कपपर्यंत वाट पहावी लागेल असं शास्त्री यांनी म्हटलं आहे. 


सर्वोत्तम संधी आताच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्लब पॅरेरी फायर पॉडकास्टवर बोलत असताना शास्त्रींनी भारतीय संघाच्या कामगिरीचं विश्लेषण केलं आहे. भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू त्यांच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च स्थानी असून फारच उत्तम कामगिरी करत आहेत. याचमुळे भारताला आयसीसीच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची उत्तम संधी आहे. रवी शास्त्रींनी हे विधान केलं तेव्हा अॅडम गिलक्रिस्ट आणि मायकल वॉर्नही या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. "देशाला सध्या क्रिकेटचं वेड लागलं आहे. यापूर्वी 12 वर्षांआधी भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यांना आता पुन्हा जेतेपद पटकावण्याची संधी आहे. सध्या ते ज्या प्रकारे खेळत आहेत ते पाहता त्यांना जेतेपद पटकावण्याची सर्वोत्तम संधी आता उपलब्ध आहे," असं रवी शास्त्री म्हणाले.


आता संधी गमावली तर...


"आता त्यांनी (जेतेपद पटकावण्याची) संधी गमावली तर कदाचित पुढील 3 वर्ल्ड कपपर्यंत वाट पहावी लागेल किंवा 3 वर्ल्ड कपनंतरच जेतेपदाचा विचार करता येईल. सध्या भारतीय संघातील 7-8 खेळाडू त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी असून ही संघासाठी सकारात्मक बाब आहे. हा त्यांचा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. त्यामुळे ते त्या पद्धतीने, ज्या परिस्थितीमध्ये खेलत आहेत ते पाहून त्यांच्याकडे विजय मिळवून देणारा संघ आहे," असं रवी शास्त्री म्हणाले.


गोलंदाजांवर कौतुकाचा वर्षाव


यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय गोलंदाजांनाही कमाल कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराजसमोर कोणताही संघ तग धरु शकला नाही. तर रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी मधल्या ओव्हरमध्ये विरोधकांना फिरकीमध्ये गुंडाळलं. भारतीय गोलंदाजीबद्दल बोलताना रवी शास्त्रींनी, "गोलंदाजांची अफलातून आहे. हे सारं एका रात्रीत घडलेलं नाही. ते सर्वजण एकमेकांबरोबर 4 ते 5 वर्षांपासून खेळत आहेत. सिराज यामध्ये 3 वर्षांपूर्वी सहभागी झाला. सातत्यपूर्ण मारा कोणत्या ठिकाणी करावा हे त्यांना ठाऊक आहे. बॉल नवीन असेल तेव्हाच विकेट घेणं महत्त्वाचं असल्याची जाण त्यांना आहे. योग्य ठिकाणी आणि सातत्यपूर्ण गोलंदाजी करणे महत्त्वाचे आहे," असं म्हटलं आहे.


गोलंदाजी स्टम्पवरच होतेय


"या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी फार कमी वेळा शॉर्ट बॉल टाकले आहेत. शॉर्ट बॉल ते फलंदाजाला सप्राइज देण्यासाठी असतात. 90 टक्के गोलंदाजी ही स्टम्पवर होते. भारतात अशीच गोलंदाजी केली पाहिजे. त्यांच्या चेंडू फेकण्याच्या शैलीमुळे चेंडूला वळण मिळत आहे. यामुळे फलंदाज अडचणीत येतात. मागील 50 वर्षांमधील हे गोलंदाजीमधील सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे," असं शास्त्रींनी म्हटलं आहे.