रतलाम : जागतिक दिव्यांग दिवसानिमित्तानं (World Disability Day) केवळ १२ वर्षांचा दिव्यांग अब्दुल कादिर याची कहाणी ही तुमच्यासाठीही प्रेरणादायी ठरू शकेल. आयुष्यात पराभव मान्य करणाऱ्या प्रत्येकासाठी अब्दुल एक नवी उमेद ठरू शकतो. १२ वर्षीय दिव्यांग अब्दुल कादिर याला दोन्ही हात नाहीत. परंतु, म्हणून त्याचं आयुष्य तिथंच थांबलं नाही... अब्दुल पोहणं शिकलाच पण सामान्य मुलांनाही मागे टाकत त्यानं पोहण्यात अनेक मेडल्स पटकावली आहेत. यावरून अब्दुलची जिद्द, उमेद आणि जगण्यावरचं अपार प्रेम तुमच्या लक्षात येऊ शकेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अब्दुल हा रतलामचा रहिवासी... त्यानं आत्तापर्यंत तीन नॅशनल पॅरा स्विमिंग स्पर्धा आपल्या नावावर केल्यात. अब्दुल कादिर २०१५ मध्ये बेळगाव, कर्नाटकात नॅशनल मास्टर पॅरा स्विमिंग कॉम्पिटिशन जिंकलाय. तसंच २०१६ मध्ये जयपूर आणि २०१७ मध्ये उदयपूरमध्ये 'नॅशनल पॅरा स्विमिंग कॉम्पिटिशन'मध्येही पदक आपल्या नावावर केलीत. उदयपूरमध्ये नॅशनल पॅरा स्विमिंग कॉम्पिटिशनमध्येही त्यानं पदक मिळवलं होतं. 


अब्दुलनं शाळा स्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत तर सामान्य मुलांनाही मागे टाकत दोन गोल्ड तसंच जिल्हास्तरीय 'चेतना खेल मेला'मध्येही तीन गोल्ड मेडल पटकावलेत.


पाण्यात पोहणारा अब्दुल एखाद्या जलचराप्रमाणेच भासतो... दिव्यांग अब्दुलला ओळखणारे लोक तर आता त्याला 'डॉल्फिन' नावानं ओळखू लागलेत. 


अब्दुल हा जन्मत:च दिव्यांग नाही. २०१४ मध्ये सात वर्षांचा असताना एका अपघातात अब्दुलनं आपले दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर अब्दुल निराश झाला होता. परंतु, आपल्या निराशेवर मात करत अब्दुल पोहणं शिकला... आणि त्यात त्यानं प्राविण्यही मिळवलं.


आपली नित्याची कामंही अब्दुल हातांशिवाय पायांनीच पूर्ण करतो. इयत्ता सातवीत असलेला अब्दुल लिहितोही पायांनीच... 


आता अब्दुलचं लक्ष्य आहे २०२४ ची ऑलिम्पिक स्पर्धा... ही स्पर्धा जिंकायचीच असा पण आता अब्दुलनं केलाय.