कुस्तीपटू विनेश फोगाटचं निलंबन, भारतीय कुस्ती महासंघाची कारवाई
टोकिया ऑलिम्पिकमध्ये पराभव पत्कराव्या लागलेल्या विनेशला आणखी एक धक्का बसला आहे
नवी दिल्ली : टोकिया ऑलिम्पिकमध्ये मेडलसाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. क्वार्टरफायनलमध्येच तिला पराभवाचा सामना करावा लागला. आणि आता विनेश फोगाटला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने विनेशचं अनिश्चित काळासाठी निलंबन केलं आहे. विनेश फोगाटसह कुस्तीपटू सोनम मलिकलाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
टोकियो ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये विनेशने नियमांचं उल्लंघन केलं. विनेशने भारतीय संघाचे अधिकृत स्पॉन्सर 'शिवनरेश' या कंपनीच्या नावाच्या जागी 'नाईकी' ब्रँडचे कपडे घातले होते. तसंच भारतीय खेळाडू राहत असलेल्या खेलग्राममध्ये राहण्यासही तिने नकार दिला. इतकंच नाही तर भारतीय खेळाडूंबरोबर सराव करण्यासही तिने नकार दिला होता.
विनेशने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाने विनेशवर निलंबनाची कारवाई केली आहे. विनेशला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली असून या नोटीशीला 16 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे. तिने दिलेल्या उत्तरावर चर्चा करण्यात येणार आहे, तोपर्यंत तिला कोणत्याही राष्ट्रीय किंवा स्थानिक कुस्ती स्पर्धांमध्ये खेळता येणार नाही.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये विनेश पदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. ऑलिम्पिकसाठी तिने हंगेरीत प्रशिक्षण घेतलं होतं तिथून ती थेट टोकियोत दाखल झाली होती. पण क्वार्टरफायनलमध्येच विनेशला बेलारुसच्या कुस्तीपटूकडून पराभव स्विकारावा लागला.