WTC Final Ind vs Aus Fifth Day Play: हाती 7 विकेट्स, लक्ष्य 280 धावा आणि ओव्हर 97... अशा परिस्थितीमध्येही भारत पाचव्या दिवशी ओव्हलच्या खेळपट्टीवर दिवस खेळून काढत भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर (WTC Final) नाव नोंदवू शकतो का, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. मात्र भारताकडून खेळणाऱ्या एका खेळाडूने भारत सहज 450 धावांचं लक्ष्य गाठू शकतो असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू शेवटच्या दिवशी कसा खेळणार यावर भारत जिंकणार की पराभूत होणार हे बऱ्याच अंशी अवलंबून असेल. भारत सहज 450 धावा करु शकतो असं म्हणणारा हा खेळाडू आहे शार्दुल ठाकूर. एक योग्य पार्टनरशीपच्या जोरावर भारत सहज 450 धावांचं लक्ष्य गाठू शकतो. मागील वर्षी इंग्लंडने ओव्हलच्या मैदानात भारताविरुद्ध एवढी मोठी धावसंख्या गाठली होती अशी आठवणही शार्दुलने करुन दिली.


इंग्लंडचं दिलं उदाहरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"क्रिकेट हा फार मजेशीर खेळ आहे. अंतिम सामन्यातील योग्य टोटल काय हे निश्चितपणे सांगता येत नाही," असं शार्दुल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाला होता. "एका उत्तम पार्टनरशीपच्या जोरावर आरामात 450 धावा किंवा त्याहून अधिक धावांचं लक्ष्य साध्य करु शकतो. मागील वर्षी आपण हे पाहिलं असून त्यावेळी इंग्लंडच्या संघाने जवळजवळ 400 धावांचं लक्ष्य इथेच गाठलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी फार विकेट्स न गमावता ये लक्ष्य गाठलेलं. त्यामुळे ही बाब आमच्यासाठी साकारात्मक आहे," असं शार्दुलने म्हटलं होतं.


एका तासात गेम फिरु शकतो


"एका तासाच्या खेळात कसोटी सामन्याचं पारडं पलटू शकतं हे आपण यापूर्वी पाहिलं आहे," असंही शार्दुल म्हणाला होता. 



शार्दूल म्हणतोय तशीच सध्या सामन्याची स्थिती


विशेष म्हणजे शार्दुलने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हे विधान व्यक्त केलं असलं तरी सध्या म्हणजेच पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी सामन्याची परिस्थिती अशीच काहीतरी आहे. तिसऱ्या दिवशी 270 धावांवर ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला. एकूण 443 धावा ऑस्ट्रेलियाने केल्याने भारताला विजयासाठी 444 धावांची गरज आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघाने 164 धावा केल्या असून आणखीन 280 धावांची गरज भारताला आहे. मात्र भारताच्या हातात 7 विकेट्स असून हे लक्ष्य भारताला 97 षटकांमध्ये गाठायचं आहे. सध्या क्रिजवर विराट कोहली नाबाद 44 धावांवर आणि अजिंक्य रहाणे नाबाद 20 धावांवर खेळत आहे. या दोघांनंतर स्वत: शार्दुलही फलंदाजीसाठी येणार आहे. त्यामुळे खरोखरच या 3 भरवशाच्या फलंदाजांपैकी दोघांनी चांगली पार्टनरशीप केली तर भारत 444 चं लक्ष्य सहज पार करु शकतो.