WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये (World Test Championship Final) कोणता संघ विजयी होणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. भारतीय संघासमोर 444 धावांचं आव्हान असून आज शेवटच्या दिवसाचा खेळ शिल्लक आहे. पाचव्या दिवशी भारतीय संघाला 97 ओव्हरमध्ये 280 धावांची गरज आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या मैदानावर आहेत. दरम्यान, क्रिकेटतज्ज्ञांच्या मते ऑस्ट्रेलियाचं (Australia) पारडं जड असून, भारत मात्र पराभवाच्या छायेत आहे. दरम्यान भारतीय संघ अपेक्षित कामगिरी करत नसल्याने भारतीय खेळाडूंसह संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडलाही (Rahul Dravid) टीकेचा सामना करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 469 धावांचा डोंगर उभा केला होता. दरम्यान, भारतीय संघ 296 धावांवर गारद झाला होता. यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने 270 धावांवर डाव घोषित करत भारतीय संघासमोर 444 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सध्या भारतीय संघाने 164 धांवर 3 गडी गमावले आहेत. पाचव्या दिवशी भारतीय संघासमोर 97 ओव्हरमध्ये 280 धावा करण्याचं आव्हान आहे. 


यादरम्यान पाकिस्तानी संघाचे माजी क्रिकेटर बसीत अली (Former Pakistani Cricketer Basit Ali) यांनी खेळाडूंच्या निवडीवरुन टीका केली आहे. बसीत अली यांच्या मते भारतीय संघाने जेव्हा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांनी सामना गमावला. यावेळी त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवरुनही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 


"भारतीय संघाने जेव्हा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांनी सामना गमावला. गोलंदाजही आयपीएलमध्ये गोलंदाजी करत असल्याप्रमाणे खेळत आहेत. लंचमध्ये तर भारतीय संघ जणू काही आपण सामना जिंकलो आहोत अशा आनंदात दिसत होते. आता मात्र भारतीय संघ चौथ्या डावात काहीतरी चमत्कार होण्याची प्रार्थना करु शकतो. भारताने केलेलं क्षेत्ररक्षण पाहता रहाणे, कोहली आणि जडेजा हेच फक्त फिट दिसत आहेत. इतर सर्व थकलेले दिसत आहेत," असं बसीत अली यांनी त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं. 


यावेळी बसीत अली यांनी भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडवरही टीका केली. राहुल द्रविडने नोव्हेंबर 2021 मध्ये प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारली होती. राहुल द्रविड एक चांगला खेळाडू आहे, मात्र कोच म्हणून झिरो आहे असं त्यानी म्हटलं आहे. भारतीय संघाच्या व्यवस्थापनावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.


"मी राहुल द्रविडचा मोठा चाहता होतो, आहे आणि यापुढेही राहीन.  तो एक क्लास खेळाडू आहे. पण कोच म्हणून तो झिरो आहे. तुम्ही भारतात फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी तयार केली. पण जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियात गेलात तेव्हा तशी स्थिती होती का? त्यांची खेळपट्टी चेंडू उसळणारी आहे. तुम्ही काय विचार करत होता देव जाणे. जेव्हा देव अक्कल वाटत होता, तेव्हा कुठे डोंगराच्या मागे लपला होतात," असा टोलाही त्यांनी लगावला.