मुंबई : टीम इंडियाने २०१९ या वर्षात सर्वाधिक वनडे आणि टी-२० मॅच जिंकल्या. पण २०१९ सालचा वर्ल्ड कप न जिंकण्याचं दु:ख भारताला नक्कीच असेल. टेस्ट क्रिकेटमध्येही भारताने एकही मॅच गमावली नाही, पण तरीही ऑस्ट्रेलियानं भारतावर टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र बाजी मारली. अन्यथा टीम इंडिया २०१९ या वर्षात वनडे, टी-२० आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारी टीम ठरली असती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने २०१९ या वर्षात ८ टेस्ट मॅच खेळल्या, यातल्या ७ मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर १ मॅच ड्रॉ झाली. यावर्षी भारताला सगळ्यात महत्त्वाचा विजय ऑस्ट्रेलियात मिळाला. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच भारताने ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकली. भारताने २०१९ मध्ये ४ टेस्ट सीरिज खेळल्या, यातल्या चारही सीरिजमध्ये भारताचा विजय झाला.


ऑस्ट्रेलियाची २०१९ या वर्षाची सुरुवात खराब झाली. वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला भारताकडून सीरिजमध्ये पराभव पत्करावा लागला. पण यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाने त्यांची कामगिरी सुधारली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धची ऍशेस सीरिज ड्रॉ केली. यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडला हरवलं. ऑस्ट्रेलियाने यावर्षी १२ टेस्ट मॅच खेळल्या, यातल्या ८ मॅचमध्ये त्यांचा विजय झाला तर २ टेस्ट मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.


२०१९ वर्षात पाकिस्तानमध्ये टेस्ट क्रिकेटचं पुनरागमन झालं. २००९ साली श्रीलंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकही टेस्ट मॅच झाली नव्हती. २०१९ मध्ये श्रीलंकेनेच पाकिस्तानमध्ये टेस्ट मॅच खेळली. कराचीमध्ये झालेल्या या टेस्ट मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला. या वर्षातला पाकिस्तानचा हा एकमेव टेस्ट विजय ठरला. २०१९ मध्ये पाकिस्तानने ६ टेस्ट मॅच खेळल्या, यातल्या ४ मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला आणि १ मॅच ड्रॉ झाली.


भारताशिवाय न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेने प्रत्येकी ८-८ टेस्ट मॅच खेळल्या. न्यूझीलंडने यावर्षी ४ टेस्ट मॅच, कर दक्षिण आफ्रिका-श्रीलंकेने प्रत्येकी ३-३ मॅच जिंकल्या. आयर्लंड आणि बांगलादेशच्या टीमला यावर्षी एकही मॅच जिंकता आली नाही.


२०१९ या वर्षात भारताने एकूण २८ मॅच खेळल्या, यातल्या ८ मॅचमध्ये भारताचा पराभव झाला, तर एका मॅचचा निकाल लागला नाही. यावर्षात भारताने सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम केला. भारतानंतर सर्वाधिक विजय मिळवणारी टीम ऑस्ट्रेलिया ठरली. ऑस्ट्रेलियाने २३ पैकी १६ मॅच जिंकल्या. २०१९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडला २२ पैकी १४ मॅच जिंकता आल्या.