८०-९० च्या दशकात धुमाकूळ घालणारी `Yezdi`पुन्हा रस्त्यावर येणार!
काही दिवसांपूर्वी जावाच्या तीन बाईक बाजारात आल्यानंतर आता येझडी(Yezdi)ही लॉन्च होणार आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी जावाच्या तीन बाईक बाजारात आल्यानंतर आता येझडी(Yezdi)ही लॉन्च होणार आहे. ८० आणि ९० च्या दशकात धुमाकूळ घालणाऱ्या बीएसए आणि येझडी लवकरच भारतीय बाजारात दिसतील असा अंदाज आहे. जावाला लॉन्च करणारी क्लासिक लिजंड्सच बीएसए आणि येझडीला रस्त्यावर आणण्याची योजना बनवत आहे. येझडीला २०१९च्या शेवटी किंवा २०२० च्या सुरुवातीला लॉन्च केलं जाऊ शकतं. नवीन येझडी जावा प्लॅटफॉर्म बेस्ड असेल तसंच याची रेंजही वेगळी असेल, अशी अपेक्षा आहे.
सुरुवातीला बाईक एक्सपोर्ट होणार
बीएसए ब्रॅण्ड येझडीआधी लॉन्च होईल असं बोललं जातंय. ऑटो वेबसाईट रशलेननं दिलेल्या बातमीनुसार ही बाईक ५०० सीसी किंवा ८०० सीसीच्या इंजिनसोबत येईल. या बाईकला सुरुवातीला एक्सपोर्ट केलं जाईल. येझडीमध्ये नवीन आणि यापेक्षा कमी डिस्प्लेसमेंटचं इंजिन असेल. नवीन येझडीचं वजनही पहिलेपेक्षा कमी असेल. यामुळे बाईक चांगलं मायलेज देईल.
जुन्या येझडीची खासियत
जुनी येझडी मोटरसायकलला २५० सीसी, २-स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन देण्यात आलं होतं. जे १३ बीएचपी पॉवर आणि २०.५ एमएम टॉर्क जनरेट करायचं. नवीन येझडीमध्ये नुकत्याच लॉन्च झालेल्या जावा बाईकला देण्यात आलेलं २९३ सीसी इंजिन असेल असा अंदाज आहे. महिंद्रा टू-व्हिलर्सनं बीएसए बाईक्सचं उत्पादन आणि वितरणाचे अधिकार विकत घेतले आहेत.