मुंबई : ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमने पाकिस्तानच्या टीमवर टीका केली आहे. वर्ल्ड कप काही दिवसांवर आला असताना खेळाडूंना बिर्याणी खायला दिली जात असण्यावर वसिम अक्रमने टीका केली आहे. वर्ल्ड कपमध्ये दिग्गज टीमशी तुम्ही बिर्याणी खाऊन स्पर्धा करू शकत नाही, असं मत वसिम अक्रमने मांडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी पाकिस्तानला आहे, पण यंदाच्या वर्ल्ड कपचा फॉरमॅट बघता तुम्हाला फिटनेसवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला अक्रमने पाकिस्तानच्या टीमला दिला आहे.


'यंदाच्या वर्ल्ड कपचा फॉरमॅट १९९२ सालच्या वर्ल्ड कपसारखाच आहे. सगळ्या टीम या एकमेकांविरुद्ध खेळतील. यातल्या टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये जातील. या फॉरमॅटमुळे तुम्ही वर्ल्ड कप नशिबाने जिंकू शकत नाही, तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल,' असं वसिम अक्रम म्हणाला.


फिटनेस ही पाकिस्तानच्या टीमची मोठी समस्या आहे. नुकताच युएईमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५-०ने पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी पाकिस्तानी टीमच्या फिटनेसवर ताशेरे ओढले.


मागच्या १५ महिन्यांमध्ये पाकिस्तानी टीमचा फॉर्म हा खराब आहे. पाकिस्तानचा न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पराभव झाला. सप्टेंबर २०१८मध्ये झालेल्या आशिया कपमध्येही पाकिस्तानने निराशाजनक कामगिरी केली.


वर्ल्ड कपसाठीच्या २३ दावेदार खेळाडूंची यादी पाकिस्तानने जाहीर केली आहे. या खेळाडूंचा फिटनेस कॅम्प घेण्यात येणार आहे. यानंतर फिट खेळाडूंची १८ एप्रिलला वर्ल्ड कपसाठी निवड केली जाणार आहे. वर्ल्ड कपआधी पाकिस्तानची टीम इंग्लंडविरुद्ध १ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.