`तू कधीच क्रिकेटपटू होणार नाहीस`
भारताच्या इंग्लंड दौऱ्याला ३ जुलैपासून सुरुवात होत आहे.
मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्याला ३ जुलैपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यामध्ये भारत ३ टी-२०, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. पण या दौऱ्याआधीच भारताला धक्का बसला आहे. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि स्पिनर वॉशिंग्टन सुंदर टी-२० सीरिजमधून दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. बुमराहऐवजी भारतीय टीममध्ये दीपक चहरची निवड करण्यात आली. याच दीपक चहरची काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी अवहेलना केली होती. तू कधीच क्रिकेट खेळणार नाहीस आणि क्रिकेटपटू होणार नाहीस, असं चॅपल दीपक चहरला म्हणाले होते. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानं हे वक्तव्य केलं आहे.
राजस्थानच्या हनुमानघरमध्ये दीपक चहर सराव करायचा. त्यावेळी त्याची आणि ग्रेग चॅपलची भेट झाली. त्यावेळी ग्रेग चॅपल राजस्थान क्रिकेट अॅकेडमीचे डायरेक्टर होते. तेव्हा चॅपल यांनी दीपक चहरला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला होता. राजस्थानच्या टीममध्ये तुझी निवड होणार नाही, एवढंच काय तू क्रिकेटपटूही होणार नाही, असं चॅपल म्हणाल्याचं आकाश चोप्रानं सांगितलं.
आयपीएलमध्ये चमकला चहर
नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये दीपक चहर चेन्नईकडून खेळला. या स्पर्धेमध्ये त्यानं उल्लेखनीय कामगिरी करत चेन्नईला सुरुवातीलाच विकेट मिळवून दिल्या. आयपीएलच्या १२ मॅचमध्ये चहरनं ७.२८ च्या इकोनॉमी रेटनं १० विकेट घेतल्या.
१२ वर्षांचा असताना दीपक चहरनं सुरतगडमध्ये क्रिकेटचा सराव करायला सुरुवात केली. दीपकच्या वडिलांनी नोकरी सोडली आणि त्याला क्रिकेटपटू बनवण्यासाठी कर्जही काढलं.