`युवराज सिंगला भारतरत्न द्या...`, माजी खेळाडूची मागणी! म्हणाले `धोनीने आधी आरशात पहावं अन्...`
Yuvraj Singh father on MS Dhoni : टीम इंडियाचा वर्ल्ड कप युवराज सिंगच्या वडिलांनी म्हणजेच योगराज सिंग यांनी आपल्या मुलाला भारतरत्न मिळावा, अशी मागणी केली आहे.
Yograj Singh on MS Dhoni : अनेक खेळाडू येतात, रेकॉर्ड्स मोडतात आणि नाव कमवून जाता, पण असे खूप कमी खेळाडू क्रिडासृष्टीला लाभले आहेत, ज्यांनी देशासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. असंच एक नाव म्हणजे वर्ल्ड कप चॅम्पियन 'युवराज सिंग'.. टीम इंडियासाठी दोन वर्ल्ड कप जिंकवून देणारा खेळाडू म्हणजे युवराज. युवराज सिंग कधीही जास्त चर्चेत नसतो. मात्र, युवराजचे वडील योगराज सिंग यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. योगराज सिंग याने अनेकदा महेंद्रसिंग धोनीवर टीका केली आहे. मुलाचं करियर खराब होण्यामागे धोनी कारणीभूत असल्याचं स्पष्ट मत योगराज सिंग मांडत असतात. अशातच आता पुन्हा टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि युवराजचे वडील योगराज यांनी धोनीवर टीकास्त्र सोडलं आहे.
काय म्हणाले योगराज सिंग?
मी महेंद्रसिंग धोनीला कधीही माफ करणार नाही. त्याने आधी त्याचा चेहरा आरशात पहावा. तो नक्कीच चांगला क्रिकेटर आहे, पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध जे काही केलं, ते आता समोर येत आहे. त्यामुळे मी त्याला आयुष्यात कधीही माफ करणार नाही. मी आयुष्यात दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत. पहिलं म्हणजे माझ्यासोबत चुकीचं करणाऱ्या लोकांना मी कधीच माफीनामा देत नाही अन् दुसरं म्हणजे मी त्यांना कधीच मिठी मारणार नाही, मग ते माझ्या कुटूंबातील असो वा माझी मुलं, असं योगराज सिंग यांनी म्हटलं आहे.
महेंद्रसिंग धोनीने माझ्या मुलाचं आयुष्य खराब केलं. तो अजून 4 ते 5 वर्ष अजूनही खेळू शकला असता. युवराजसारखे खेळाडू माझ्यासारख्या अनेकांनी जन्माला घातले पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग देखील म्हटले होते की, युवराज सारखा प्लेयर पुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे कॅन्सर असताना देखील देशासाठी वर्ल्ड कप खेळल्याबद्दल भारताला त्याला भारतरत्न द्यावा, अशी मागणी योगराज सिंग यांनी केली आहे.
दरम्यान, योगराज सिंग यांनी वारंवार धोनीवर टीका केली आहे. यामागे पुत्रप्रेम असलं तरी देखील युवराजचं करियर हलक्यात घेता येणार नाही. व्हाईट बॉल क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून युवराजची गणना होते. फॉर्ममध्ये नसणारा धोनी 2019 पर्यंत खेळू शकतो तर मग फायटर युवराज का नाही? असा सवाल क्रिडाविश्वात मागील 7 वर्षांपूर्वी चर्चेत होता. कॅन्सरवर मात करत पुन्हा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागम करणाऱ्या युवराज सिंगचा संघर्ष मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अशातच आता योगराज सिंग यांची भूमिका सिनेमामध्ये कशी असेल? यावरून अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.