मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास कोणाच्या ध्यानीमनी नसतानाच, भारतीय क्रिकेट गजताला काहीशी धक्का देणारी घटना घडली. ही घटना होती, 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीची. धोनीनं इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्याच नावाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच दिलखुलास व्यक्तीविषयी बोलत होतं. संघातील खेळाडूही यात मागे राहिले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा माहिसोबत खेळपट्टीवर विरोधी संघापुढं आव्हान उभं करणाऱ्या आणि मुख्यत्त्वे २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात त्या अखेरच्या षटकारावेळी खेळपट्टीवर त्याच्यासोबत उपस्थित असणाऱ्या युवराज सिंग यानं माहिसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. धोनीसोबतच्या काही क्षणांची छायाचित्र सुरेख पद्धतीनं गुंफलेल्या या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेट संघाचा एक सुवर्णकाळ पाहायला मिळत आहे. 


युवीनं हा व्हिडिओ पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये धोनीसोबतच्या काही खास आठवणींना उजाळा दिला. 'अद्वितीय कारकिर्दीसाठी तुझं अभिनंदन माही. देशासाठी तुझ्यसमवेत २००७ आणि २०११ चा विश्वचषक उचलण्याचा आणि खेळपट्टीवर तुझ्यासोबतच्या भागीदारीचा आनंद काही औरच. तुझ्या भवितव्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा.....', असं कॅप्शन लिहित युवराजनं त्याच्या ऑनफिल्ड साथीदाराच्या पाठीवर आपलेपणाची थाप मारली. 



 


जवळपास दहा वर्षांहून अधिक काळ, धोनी आणि युवराजनं भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीची मधली फळी सांभाळली. अनेक अटीतटीच्या सामन्यांमध्ये अगदी अखेरच्या क्षणी या दोघांनी संघाला विजय मिळवून दिला. भागीदारीनं या दोघांनीही ३००० धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंमध्ये असणारं नातं आणि त्यांचा खेळ पाहणं क्रीडारसिकांसाठी खऱ्या अर्थानं परवणीच.