मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे टीम इंडियाचे खेळाडू मागच्या ५ महिन्यांपासून घरीच आहेत. कोरोना लॉकडाऊनची सुट्टी एन्जॉय करतानाच भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. ट्विटरवर युझवेंद्र चहलने त्याच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेयर केला आहे. युझवेंद्र चहल युट्युबर धनश्री वर्मासोबत लग्नगाठ बांधणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या कुटुंबासोबतच आम्हीही एकमेकांना हो म्हणलं, असं ट्विट युझवेंद्र चहलने केलं आहे. युझवेंद्र चहलने धनश्री वर्मासोबतच्या रोका सोहळ्याचा फोटो ट्विट केला आहे. युझवेंद्र चहल आमि धनश्री यांचं लग्नाच्या तारखेबाबत मात्र अजूनही माहिती मिळालेली नाही. 




टीम इंडियाकडून खेळणारा युझवेंद्र चहल आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळतो. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये युएईत आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्च ते मे महिन्यात भारतात होणारी आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप कोरोना व्हायरसमुळे रद्द झाल्याने आयपीएलचा मार्ग अखेर मोकळा झाला. 


युझवेंद्र चहलने आयपीएलमध्ये ८४ मॅचमध्ये १०० विकेट घेतल्या आहेत. तर भारताकडून खेळताना चहलने वनडे क्रिकेटमध्ये ५२ मॅचमध्ये ९१ विकेट आणि ४२ टी-२० मॅचमध्ये ५५ विकेट घेतल्या आहेत.